परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्याकडे पावसाने फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 11:14 AM2020-06-18T11:14:04+5:302020-06-18T11:15:39+5:30
जिल्हाभरात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे.
परभणी : सुरुवातीच्या टप्प्यात जोरदार बरसलेल्या पावसाने दोन दिवसांपासून सहा तालुक्याकडे पाठ फिरवली आहे. बुधवारी रात्री परभणी, पालम आणि गंगाखेड या तीन तालुक्यात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीला दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी पेरण्यानाही सुरुवात केली आहे. बुधवारी रात्री परभणी तालुक्यामध्ये ०.७५ मिमी, पालम ६ मिमी आणि गंगाखेड तालुक्यात १.५० मिमी असा जिल्ह्यांमध्ये सरासरी ०.९२ मिमी पाऊस झाला आहे. उर्वरित तालुक्यात मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे.
यावर्षी जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. सोनपेठ (८८ टक्के), सेलू (९८ टक्के) आणि जिंतूर (९१ टक्के) या तालुक्यांमध्ये मात्र अपेक्षित पावसापेक्षा कमी पाऊस झाला. परभणी तालुक्यामध्ये अपेक्षित पावसाच्या ११९ टक्के, पालम तालुक्यात १२०टक्के, गंगाखेड १२९ टक्के, पूर्णा १६० टक्के, पाथरी १९८ टक्के आणि मानवत तालुक्यामध्ये १८ जूनपर्यंत होणाऱ्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत १६० टक्के पाऊस झाला आहे. एकंदर जिल्हाभरात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे.