आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघेना; १८ रुग्णांची डायलेसिस प्रक्रिया थांबली

By मारोती जुंबडे | Published: November 28, 2023 05:53 PM2023-11-28T17:53:28+5:302023-11-28T17:55:06+5:30

मागील ३४ दिवसापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी, कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.

No solution to health workers' agitation; Dialysis process of 18 patients stopped in Parabhani | आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघेना; १८ रुग्णांची डायलेसिस प्रक्रिया थांबली

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघेना; १८ रुग्णांची डायलेसिस प्रक्रिया थांबली

परभणी: एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाची अट शिथिल करून नियमित रिक्त पदावर समायोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय तत्काळ घेण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी मागील ३४ दिवसापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी, कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील ३०० कर्मचाऱ्यांरी पाठींबा देत संपावर गेले. परिणामी, रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. विशेष म्हणजे १८ रुग्णांची डायलेसिस प्रक्रिया या आंदोलनामुळे थांबली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तांत्रिक व अतांत्रिक पदावर कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे सेवा प्रवेश नियम त्वरित तयार करून तत्काळ सेवा समायोजन करण्यात यावे, ज्या तांत्रिक व अतांत्रिक पदाचे सेवा प्रवेश नियम हे तयार आहेत. त्या पदाचे प्रथम टप्प्यात सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागाच्या आरोग्य विभागातील मंजूर रिक्त पदावर थेट सेवा समायोजन करण्यात यावे, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे सेवा समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन धोरण लागू करण्यात यावे, एच. आर. पॉलिसी त्वरित लागू करण्यात यावी, यासह विविध मागण्यासाठी २५ ऑक्टोबर पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी, कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. मात्र आंदोलनाची दखल अद्याप पर्यंत शासन व प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आक्रमक पवित्रा घेतला.

जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील मानसिक आरोग्य कार्यक्रम, डॉक्टर्स, अधिपरिचारिका, समुपदेशन, लॅब टेक्निशन, औषध निर्माण अधिकारी आदी सह इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आले. या कर्मचाऱ्यांच्या आक्रमक पवित्रामुळे २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रुग्णांवरील डायलिसिस प्रक्रिया पुढे ढकलण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर रुग्णसेवेवरही मोठा परिणाम झाला आहे. जोपर्यंत एनएचएम अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्न निकाली काढण्यात येणार नाही. तोपर्यंत कामावर न जाण्याचा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. या आंदोलनात जिल्हा रुग्णालय अंतर्गत येणारे ३०० कर्मचारी सहभागी झाले आहेत.

घोषणाबाजीने दणाणला परिसर
मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत बेमुदत संप पुकारला आहे. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारती समोर एकत्र येत शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी डॉ. अमित बोरगावकर, डॉ. विजय गाजभारे, डॉ. जेथलिया, डॉ. तेजस तांबुली, महावीर जैन, महेश नाव्हेकर, माधव जाधव, बालाजी देवडे, कृष्णा चापके, पूजा काळे, किशोर नंद, दत्ता सोळंके, राहुल भंडारे, जगदीश हत्तींआंबीरे, माधवी जोगदंड, प्रशांत पतंगे, अच्युत चौधरी, संजीवनी शिंदे आदींची उपस्थिती होती.

Web Title: No solution to health workers' agitation; Dialysis process of 18 patients stopped in Parabhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.