वाहन चालकांच्या संपाने पेट्रोल पंपांवर नो स्टॉक; विद्यार्थी, शेतकरी अन् प्रवाशांची गैरसोय
By मारोती जुंबडे | Published: January 2, 2024 07:17 PM2024-01-02T19:17:58+5:302024-01-02T19:18:21+5:30
सोमवार आणि मंगळवारी दिवसभर परभणी शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी रांगा लावल्या.
परभणी : केंद्र सरकारच्या येऊ घातलेल्या कायद्याला विरोध करण्यासाठी आक्रमक झालेल्या वाहनचालकांनी राज्यभर आंदोलन सुरू केल्याचा परिणाम शहरातील पेट्रोल पंपांवर झाला. आंदोलनानंतर काही तासांतच शहरातील एकूण ६५ पैकी १५ पेट्रोल पंपांवर नॉन स्टॉपचे फलक झळकले. मंगळवारी संप सुरूच राहिल्याने इंधन टंचाईची झळ बुधवारीही जाणवणार असल्याने वाहनचालकांनी वाहनांच्या टाक्या मंगळवारी फुल्ल करून घेण्यासाठी दिवसभर पंपांवर रांगा लावल्या होत्या.
नवीन मोटार कायद्यामध्ये वाहनचालकांवरील दहा वर्षे सजा, सात लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आल्याने राज्यभर वाहनचालक आक्रमक झाले असून, १ जानेवारीपासून संप पुकारला आहे. त्याचा फटका परभणी जिल्ह्यातही बसला आहे. या संपामध्ये ट्रक आणि टँकरचालकांनी सहभाग घेतल्याने सोमवारपासूनच जिल्ह्यातील पंपांवर पेट्रोल, डिझेल येणे बंद झाले. त्यामुळे सोमवार आणि मंगळवारी दिवसभर परभणी शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी रांगा लावल्या. त्याचबरोबर तिन्ही तेल कंपन्यांच्या डेपोतून ट्रकचालकांनी संप पुकारत तसेच वितरकांचे टँकरही रोखून धरल्याने जिल्हाभरात मंगळवारी इंधन टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यातच इंधन मिळणार नाही, या भीतीने वाहनचालकांनी मंगळवारी पहाटेपासूनच पेट्रोल पंपांवर रांगा लावल्या होत्या. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर बुधवारी बहूतांश पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लावावे लागणार आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ६५ पेट्रोल पंपांपैकी १५ पेट्रोल पंपांवर मंगळवारी नो स्टॉकचा बोर्ड लागला होता. त्यामुळे राज्य शासन व प्रशासनाने मध्यस्थी करत किमान ट्रक आणि टँकर चालकांचा तरी संप मिटविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आता नागरिकांतून होत आहे.
स्टेअरिंग छोडोच्या आंदोलनाने विद्यार्थ्यांना फटका
नवीन हिट अँड रन कायद्याला विरोध करत तसेच कायद्यात बदल करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील राणा एकता स्कूल वाहक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकत्र येत स्टेअरिंग छोडो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य दिसून आली. या आंदोलनानंतर मंगळवारी राणा एकता स्कूल वाहक संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
लाल बावटा वाहन चालक-मालक संघटनेचे धरणे
केंद्र सरकारच्या वाहन चालक यांच्यावर लादलेल्या मनमानी धोरणाविरोधात २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात लाल बावटा वाहन चालक-मालक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नवीन कायद्यानुसार वाहनचालकावरील दहा वर्षे सजा, सात लाख रुपये दंडाची तरतूद तत्काळ रद्द करावी, वाहन दंडातील वाढीव तरतूद रद्द करा, आरटीओकडून हप्तेखोरी व दलालीखोरी बंद करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी मंगळवारी दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वाहनचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दूध, भाजीपाला वाहतुकीलाही फटका
दूध संकलन करणाऱ्या वाहनांना आणि भाजीपाल्यांची वाहतूक करणाऱ्या ग्रामीण भागातील वाहनांना पेट्रोल, डिझेल नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागले, तर दुसरीकडे भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटल्याने भाजीपाला वितरणावर जिल्ह्यात मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले.