आता कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:17+5:302021-06-25T04:14:17+5:30
कोरोनाच्या संसर्गानंतर आता आरोग्याविषयी नागरिकांना अधिक जागरुक राहणे गरजेचे झाले आहे. कानांना बुरशी आणि बॅक्टेरिया वाढण्याचा हा आजार दरवर्षीच ...
कोरोनाच्या संसर्गानंतर आता आरोग्याविषयी नागरिकांना अधिक जागरुक राहणे गरजेचे झाले आहे. कानांना बुरशी आणि बॅक्टेरिया वाढण्याचा हा आजार दरवर्षीच पावसाळ्यात येतो. ज्यांचा कानाचा पडदा फाटला आहे, ज्यांना कानाला पूर्वीपासूनच इन्फेक्शन आहे, अशा नागरिकांमध्ये बुरशी वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या नागरिकांमध्येही हा आजार उद्भवू शकतो. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. केवळ निष्काळजीपणामुळे ही बुरशी वाढू शकते. त्यामुळे कानाच्यासंदर्भाने तक्रारी असल्यास नागरिकांनी थेट कान-नाक- घसा तज्ज्ञांशी संपर्क साधून उपचार केल्यास कानांपासून होणारा धोका टळू शकतो.
काय घ्याल काळजी?
कान नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवावेत. विशेषत: अंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कान तातडीने कोरडे करावेत. हेडफोन वापरत असाल तर तो वारंवार निर्जंतुक करा. टोकदार वस्तूने कान स्वच्छ करू नका. कान दुखू लागल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घ्या.
काडीने कान स्वच्छ करणे, कानात तेल टाकणे, असे घरगुती उपाय करू नयेत. परस्पर कोणतेही ड्रॉप्स वापरू नयेत. कानाचा पडदा नाजूक असतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.
पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका
पावसाळ्यात वातावरणात ओलावा आणि आर्द्रता अधिक असते. त्यामुळे कानात बुरशी होण्याची शक्यता असते. पावसात भिजल्यानंतर कान नीट स्वच्छ न करणे, कानात काडी घालण्याच्या प्रकारामुळे बुरशी होऊ शकते. ज्यांचे कानाचे पडदे फाटलेले आहेत, त्यांना हा धोका अधिक आहे.
कान दुखू लागल्यानंतर अनेकजण घरगुती उपचार करतात. कानात तेल टाकतात. तसेच परस्पर स्वत:हून कानाचे ड्रॉप टाकले जातात. अति ॲन्टिबायोटिक आणि स्टुरॉईडमुळे बुरशी आणि बॅक्टेरियल संसर्ग होण्याची शक्यता असते. तेव्हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपचार घेतले पाहिजेत.
कानात काडी घालण्याची सवय असणे, कानाचे पडदे फाटणे यामुळे कानांना बुरशी होऊ शकते. आर्द्रता वाढल्याने हा बुरशीचा आजार होतो. तसेच अनेकांना कानाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र ते टाळतात. अशा रुग्णांना कानांना बुरशी आणि बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
- डाॅ. तेजस तांबोळी