आता येणाऱ्या निवडणुकीत आम्हीच सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार: मनोज जरांगे
By ज्ञानेश्वर भाले | Published: March 11, 2024 07:00 PM2024-03-11T19:00:42+5:302024-03-11T19:01:06+5:30
सरकारकडून आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो असं सांगत जात असले तरीही, आता तुमची वेळ आमच्या हातात आहे. -मनोज जरांगे
परभणी :मराठा आरक्षणाच्या दृष्टीने सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही, मागणी वेगळी आणि दिलेलं आरक्षण वेगळं ही भूमिका समाजाला मान्य नाही. सरकारकडून आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो असं सांगत जात असले तरीही, आता तुमची वेळ आमच्या हातात आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत मराठा समाज निश्चितच तुमचा करेक्ट कार्यक्रम करेल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी परभणी शहरात सोमवारी संवाद यात्रेच्या माध्यमातून समाज बांधवांशी बोलत व्यक्त केला.
गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी मागणी आहे. त्यासाठी सरकारने वेळोवेळी आम्हाला आश्वासने पण दिली. परंतु समाजाची दिशाभूल करत अपेक्षित नसताना वेगळा प्रवर्ग निर्माण करून दहा टक्के आरक्षण दिले. मात्र, हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही. ओबीसी आरक्षणातून मागणी असताना त्याकडे सरकारने दुर्लक्ष करून समाजाची दिशाभूल केली. यासह सगे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या सरकारसह लोकप्रतिनिधींचा मराठा समाज आगामी निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करेल, अशी भूमिका यावेळी जरांगे पाटलांनी मांडली.
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचा आम्ही सन्मान केला, वारंवार त्यांनी दिलेल्या मुदतीपेक्षा आम्ही सरकारला मराठा आरक्षण मिळण्यासाठी अधिक वेळ दिला. परंतु त्यांनी वेळेवर समाजाची दिशाभूल करून आम्हाला अंधारात ठेवले. त्यामुळे आगामी काळात निश्चितच समाज त्याचा बदला घेणार हे नक्की. आम्हाला राजकारणाचे काही देणं घेणं नाही, आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसीतून आरक्षण देत सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. जर सरकार असे करत असेल तर आम्ही निवडणुकीच्या रिंगणासह राजकारणात येणार नसल्याची भूमिका जरांगे पाटलांनी यावेळी मांडली.