आता महाबळेश्वर सोडा, परभणीला चला; पारा ५.७ अंशावर घसरला
By मारोती जुंबडे | Published: January 9, 2023 09:22 AM2023-01-09T09:22:34+5:302023-01-09T09:24:12+5:30
परभणी जिल्ह्यात हुडहुडी कायम; एकाच दिवसात ४ अंशांनी घसरला पारा
परभणी : जिल्ह्यात थंडीची लाट कायम असून पाऱ्याची घसरण सुरूच असल्याचे दिसून येत आहे. रविवारी जिल्ह्याचा पारा
९ अंशावर होता. मात्र सोमवारी त्यात आणखीन घसरण झाली असून ५.७ अंशावर पारा आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात हुडहुडी कायम असून परभणी जिल्हा सर्वात कुल असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, परभणीकर वाढत्या थंडीने गारठल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे आता महाबळेश्वर पेक्षा परभणीचे तापमान सोमवारी गारठले आहे.
शहराचे किमान तापमान सोमवारी ५.७ एवढे नोंद झाले. रविवारी ९ अंश सेल्सिअस तर शनिवारी किमान तापमान १४ अंश एवढे होते. गेल्या चार दिवसांपासून शहर परिसरात धूक्याची चादर दररोज सकाळी पसरत आहे. त्यामुळे जनजीवनावर सुद्धा परिणाम झाला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये तापमानात सातत्याने घट होत आहे. डिसेंबर महिन्यात १० तारखेला सर्वाधिक कमी तापमान ८.५ अंश नोंद झाले होते. त्यानंतर पुन्हा सातत्याने तापमानात वाढ झाली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमानात घट होत असल्याने परभणीकरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव मिळत आहे. त्यातच सोमवारी तर एकाच तापमानात ४ अंशांनी घट होऊन ५.७ अंशांवर पोहचले आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात हुडहुडी कायम आहे.
आठवडाभरात ६.८ अंशांची झाली घट
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील तापमानात चांगलीच वाढ झाली होती. त्यामुळे रब्बीतील पिकांना मोठा फटका बसला. मात्र नववर्षाच्या सुरवातीलाच जिल्ह्यातील हवेत गारवा निर्माण झाला. सोमवार १२.५,मंगळवार १४.८,बुधवार १५.७,गुरुवार १६.२,शूक्रवार १५.३,शनिवार १४.०,रविवार ९.० होते. तर सोमवारी हेच तापमान ४अंशांनी खाली येत ५.७ अंशांवर आहे.
शेकोट्या पेटल्या
जिल्ह्यात अचानक थंडीचा जोर वाढल्याने रात्रीच काय तर दिवसाही नागरिक शेकोट्या पेटून लागले आहेत. थंडीमुळे जागोजागी सेकोट्या पेटून नागरिकांचा घोळका तेथे जमा झाल्याचे दिसत आहे. थंडीच्या लाटेमुळे नागरिकांची दिनचर्या बदलून गेल्याचे जिल्ह्यात दिसत आहे.