आता २०० लोकांच्या उपस्थितीत होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:24 AM2021-08-17T04:24:32+5:302021-08-17T04:24:32+5:30
परभणी शहरात मागील वर्षी एप्रिलपासून कोरोनामुळे लाॅकडाऊन लागले होते. पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही लाॅकडाऊनमध्ये लग्न समारंभ आणि विविध ...
परभणी शहरात मागील वर्षी एप्रिलपासून कोरोनामुळे लाॅकडाऊन लागले होते. पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही लाॅकडाऊनमध्ये लग्न समारंभ आणि विविध सामाजिक कार्यक्रम तसेच वैयक्तिक सण-समारंभ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरे करण्याचे निर्बंध होते. या निर्बंधामुळे लग्न, मुंज, साखरपुडा व विविध कार्य घरगुती स्तरावर केले जात होते. आता जिल्हा प्रशासनाने सेकंड अनलॉकनंतर १३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील विवाह सोहळे २०० लोकांच्या उपस्थितीत साजरे करण्यासाठी लॉन तसेच मंगल कार्यालय व खुल्या प्रांगणातील कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. यामुळे मागील वर्षभरात आर्थिक नुकसान सहन कराव्या लागलेल्या मंगल कार्यालय चालकांसह त्यांच्यावर अवलंबून असलेल्या घोडा, बँड, केटरिंग, मंडप, डेकोरेशन या व्यावसायिकांना आता नवीन लग्नसोहळे आणि इतर कार्यक्रमांच्या नोंदणीची प्रतीक्षा लागली आहे.
लग्न समारंभासाठी या आहेत अटी
शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने हाॅल, मंगल कार्यालय, लाॅन्स तसेच मोकळ्या आणि बंदिस्त जागा यांना आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने किंवा जास्तीत जास्त २०० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न करण्यास परवानगी दिली आहे. लॉन तसेच मंगल कार्यालय व खुल्या प्रांगणातील कार्यक्रमांना हीच अट कायम आहे; मात्र असे करताना कोविडच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जाईल, याची अट घालण्यात आली आहे. तसेच सर्व नियम भोजन व्यवस्थापन, बँडपथक, फोटोग्राफर्स यांनाही लागू असतील, असे आदेश काढले आहेत.
लग्नाच्या तारखा
२० ऑगस्ट, २० नोव्हेंबर, २१ नोव्हेंबर आणि दिवाळी तसेच तुळशीचे लग्न झाल्यानंतर लग्न सोहळ्याच्या तारखा आहेत. सध्या तारीख नसली तरी आपत्कालीन परिस्थितीत लग्न करण्यासाठी शुभ दिवस पाहून लग्न सोहळे पार पाडले जात आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती लक्षात घेता अनेक जण घरातील मुला-मुलीचे लग्नकार्य लवकर करण्यासाठी पर्यायी तारखा विचारुन लग्न सोहळे पार पाडत आहेत. प्रत्यक्ष लग्न तारखा दिवाळीनंतर आहेत. - संजय जोशी-वझरकर.
मंगल कार्यालयात उत्साहाला उधाण
आतापासून अनेक जण ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर या महिन्यातील तारखेच्या मंगल कार्यालय नोंदणीसाठी विचारण्यास येत आहेत. मागील वर्षी पूर्ण व्यवसाय ठप्प पडल्याने यंदा तरी चांगला व्यवसाय होण्यासाठी ही अट कायम राहणे गरजेचे आहे. - अभिषेक वाकोडकर.
बँडवालेही जोरात
सध्या लग्न सोहळ्याच्या तारखा नसल्याने बँड व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. अजून व्यवसायाला सुरुवात झाली नाही; मात्र दिवाळीनंतर लग्न तारखा असल्याने काही जण आतापासून येऊन सुपारी देऊन जात आहेत. - लक्ष्मण भांगे.
३० ते ४० बँडवाले
परभणी शहरात जवळपास ३० ते ३५ मंगल कार्यालय आहेत तर तेवढेच बँडवाले आहेत. मागील वर्षभरापासून विवाह सोहळे घरगुती स्तरावर झाल्याने अनेकांच्या हाताचे काम गेले. आता ज्यावेळी परवानगी मिळाली आहे, त्यावेळी फारशा लग्नतारखा नाहीत. यामुळे अजूनही काहीकाळ थांबावे लागणार आहे.