आता ऊस लागवडीसाठी ट्रॅक्टरचा वापर; पालम तालुक्यात सरी ओढण्यासाठी उपयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 04:03 PM2018-01-04T16:03:42+5:302018-01-04T16:06:10+5:30
वेळ व श्रमाची बचत करण्यासाठी यावर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाकडे वळले आहेत. याचाच एक भाग म्हणून ऊस लागवडीत ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे.
पालम (परभणी ) : वेळ व श्रमाची बचत करण्यासाठी यावर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाकडे वळले आहेत. याचाच एक भाग म्हणून ऊस लागवडीत ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे.
पालम तालुक्यात यावर्षी गोदावरी नदीच्या पट्ट्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबीन व कापूस पिकाने झटका दिल्याने शेतकरी उसाची लागवड करताना दिसत आहेत. बोंडअळीग्रस्त कापूस पिकांचे पंचनामे होताच उपटून फेकले जात आहे. यानंतर या शेतात ऊस लावला जात आहे. वेळेत उसाची लागवड व्हावी, यासाठी बैलाचा वापर कमी होत आहे. नांगरटी, तिरी, रोटावेटर ही कामे एकाच दिवसात करावी लागत आहेत. यामुळे घाई करीत शेतकरी मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. मशागत होताच सरी यंत्राने साखर कारखान्याच्या शिफारशीनुसार चार फुटावर सरी ओढली जात आहे. मशागत व सरी ओढण्याच्या कामास एकरी दोन हजारांचा खर्च येत आहे.
कृषी विभाग सहभाग वाढला
शेतक-यांनी यांत्रिकीकरणाकडे वळावे, यासाठी शासनाचा कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. यावर्षी तालुका कृषी कार्यालयाने दहा ट्रक्टर, शेती औजारे अनुदानावर उपलब्ध केले आहेत. त्यामुळे गावोगाव शेती कामासाठी ट्रक्टर मिळत असल्याने शेतकरी वर्गाची मेहनत कमी होण्यास मदत झाली आहे.
काम लवकर होण्यास मदत
ऊसाची लागवड करताना मशागत करावी लागते. यावर्षी लागवडीची वेळ निघून जात आहे. त्यामुळे बैलाने कामे करणे अवघड होत आहे. ट्रक्टरने संपूर्ण कामे होत असून, लवकर कामे होत असल्याची प्रतिक्रिया आरखेड येथील शेतकरी ज्ञानोबा भानुदास दुधाटे यांनी दिली.