आता प्रत्येक वसाहतीत लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:23 AM2021-09-07T04:23:00+5:302021-09-07T04:23:00+5:30
परभणी : शहरातील लसीकरणाच्या मोहिमेला गती देण्यासाठी आता प्रत्येक वसाहतीत लसीकरण शिबिर घेतले जाणार असून, त्यासाठी २३ मोबाइल पथकांची ...
परभणी : शहरातील लसीकरणाच्या मोहिमेला गती देण्यासाठी आता प्रत्येक वसाहतीत लसीकरण शिबिर घेतले जाणार असून, त्यासाठी २३ मोबाइल पथकांची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली.
जिल्हाधिकारी गोयल यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन लसीकरण मोहिमेची माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, मनपा आयुक्त देवीदास पवार, उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर यांची उपस्थिती होती. गोयल म्हणाल्या, जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यात ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात प्रतिसाद कमी आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर आणि लसीकरण हे दोनच पर्याय आहेत. शहरात ४ लाख लोकसंख्येचे लसीकरण करावयाचे आहे. प्रत्यक्षात ८० हजार नागरिकांचेच लसीकरण झाले आहे. त्यामुळे उर्वरित ३ लाख २० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या अंतर्गत १६ लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त २३ मोबाइल पथकांची स्थापना करण्यात आली आहे. दररोज एका प्रभागात शिबिर घेतले जाणार आहे. यासाठी बी.एल.ओ., आशा स्वयंसेविका, मनपा कर्मचारी अशा २६४ कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरुवातीला घरोघरी जाऊन लसीकरणासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. यासाठी नगरसेवक, तसेच त्या त्या प्रभागातील नागरिकांचे सहकार्य घेतले जाणार आहे. दररोज साडेतीन हजार लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच प्रत्येक वॉर्डातील मतदान केंद्रावर लसीकरणासंदर्भात नोंदणी होणार आहे. सध्या जिल्ह्यात लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच लस घेण्यासाठी ५० जणांचा गट तयार झाल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र शिबिर आयोजित करण्याची तयारी केली असल्याचे गोयल यांनी सांगितले.