परभणीत महापालिकेने काढली अतिक्रमणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 11:42 PM2019-06-29T23:42:06+5:302019-06-29T23:42:29+5:30
महापालिकेने शहरात स्वच्छता मोहीम सुरु केली असून या अंतर्गत डनलॉप रोड, नीरज हॉटेल ते हाके मेडिकल परिसरातील अतिक्रमणे शनिवारी हटविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: महापालिकेने शहरात स्वच्छता मोहीम सुरु केली असून या अंतर्गत डनलॉप रोड, नीरज हॉटेल ते हाके मेडिकल परिसरातील अतिक्रमणे शनिवारी हटविण्यात आली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मोठ्या नाल्यांची स्वच्छता केली जात आहे. शनिवारी नीरज हॉटेल ते हाके मेडिकल या परिसरात असलेल्या मोठ्या नाल्यातील गाळ उपसण्यात आला. सिद्धार्थनगरातील लहान-मोठ्या नाल्यांचीही सफाई करण्यात आली. त्याचप्रमाणे प्रभागांतर्गत साचलेले पाणी बाहेर काढून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नवा मोंढा परिसर, गांधी पार्क, शिवाजी चौक या भागातील रस्त्यावर साचलेला कचरा उचलण्याचे कामही सुरु असल्याची माहितीही महापालिकेने दिली. शहरातील सर्व प्रभागातील नाल्यांचीही सफाई केली जाणार आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली आहेत. या अतिक्रमणांमुळे स्वच्छतेच्या मोहिमेतही अडथळा येत असल्याने आयुक्त रमेश पवार यांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निरज हॉटेल ते हाके मेडिकल आणि डनलॉप रोड भागातील अतिक्रमणे शनिवारी हटविण्यात आली.
प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक , अलकेश देशमुख, मुस्तदीरखान, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा, शेख शादाब, नवरत्न घुगे यांनी ही कारवाई केली. दरम्यान, शहरातील नाल्यांची सफाई आणि अतिक्रमण मोहीम हटविण्याची मोहीम सुरु राहणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
स्वच्छतेची पाहणी
परभणी: शहरात सुरु असलेल्या स्वच्छतेच्या कामांची पाहणी करुन आयुक्त रमेश पवार यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. पावसाळ्यात नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता असल्याने मनपाने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत शहरात सुरू असलेल्या कामांची पाहणी आयुक्त पवार यांनी केली.
नोटिसा देऊन जागा मोकळ्या करा
रस्त्याच्या कडेने अस्थाई स्वरुपात अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांना तात्काळ नोटिसा देऊन जागा मोकळ्या कराव्यात, अशा सूचना आयुक्त रमेश पवार यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत जीर्ण असलेल्या इमारतींची पाहणी करुन इमारत मालकांना नोटिसा द्याव्यात. शहरात स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले असून स्वच्छतेची कामे करावीत, ज्या स्वच्छता निरीक्षकांनी हे काम हाती घेतले नाही, त्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे.