परभणीत कृत्रिम पावसाच्या प्रयोगानंतर अहवाल निरंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 03:21 PM2019-09-16T15:21:32+5:302019-09-16T15:23:10+5:30
किती पाऊस पडला याबाबत शंका
परभणी : जिल्ह्यातील परभणी आणि गंगाखेड या दोन तालुक्यांत शनिवारी सायंकाळी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला़ या प्रयोगानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने परभणी तालुक्यात काही भागात दोन-अडीच तास पाऊस झाल्याचे सांगण्यात आले़ परंतु, प्रत्यक्षात रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत घेतलेल्या नोंदीनुसार परभणी तालुक्यात निरंक पावसाची नोंद घेण्यात आली़ त्यामुळे या प्रयोगाने कितपत पाऊस झाला? या विषयी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे़
परभणी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शनिवारी जिल्ह्यातील परभणी आणि गंगाखेड या दोन तालुक्यांमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला़ परभणी तालुक्यातील साळापुरी, पोखर्णी, कौडगाव या भागात विमानाद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग झाला तर गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी, दामपुरी, खोकलेवाडी, बनपिंपळा आणि चिंचटाकळी या चार तालुक्यांमध्ये हा प्रयोग करण्यात आला़ दोन्ही तालुक्यांत केलेल्या प्रयोगानंतर जिल्हा प्रशासनाने पावसाची माहिती संकलित केली होती़ त्यानुसार परभणी तालुक्यातील साळापुरी परिसरात दोन तास चांगला तर पोखर्णी परिसरात अडीच तास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याची नोंद त्याच दिवशी घेण्यात आली.
मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची नोंद घेतली असता परभणी तालुक्यात पाऊसच झाला नसल्याचा अहवाल महसूल प्रशसनाने दिला आहे़ तर गंगाखेड तालुक्यातील काही भागात २० ते ३० मिनिटांपर्यंत पाऊस झाल्याचे सांगण्यात आले होते़ प्रत्यक्षात गंगाखेड तालुक्यातही सरासरी केवळ ७़५० मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे़ त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगाने किती पाऊस पडला? याविषयी शंका उपस्थित होत आहे़ एकीकडे त्याच दिवशी पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली असली तरी दुसरीकडे दैनंदिन अहवालात मात्र तुरळक पावसाच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत़
सेनगाव तालुक्यात कृत्रिम पाऊस
हिगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील येलदरी धरण परिसरात १५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ३८ मिनिटांच्या दरम्यान कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. धरण परिसरात दुपारी आभाळ भरून आले होते याच दरम्यान दहा ते पंधरा मिनिटे कृत्रिम पावसाचे विमान ढगांवर फवारणी करत असल्याचे दिसून आले. मात्र सदरील परिसरात पाहिजे तेवढा पाऊस पडला नाही, धरणाच्या नियंत्रण कक्षामध्ये सदरील पावसाची नोंद अर्धा मिलीमीटर एवढीदेखील झाली नाही.
जिल्ह्यातील भूजल पातळी वाढविण्यासाठी हा पाऊस पूरक नसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे कृत्रिम पाऊस पाडणारी यंत्रणा कार्यान्वित केली असून या यंत्रणेच्या सहाय्याने १५ सप्टेंबर रोजी परभणी व हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरण परिसरात दुपारी २ वाजून ३८ मिनिटांच्या सुमारास कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात आला. यामध्ये सेनगाव तालुक्यातील येलदरी धरणासह काही गावांमध्ये हा कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. तालुक्यात काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. मागील सहा वर्षांपासून या धरणात पाणीसाठा वाढलेला नाही. या कृत्रिम पावसाचा प्रयोग पूर्ण यशस्वीपणे झाला नसला तरी सेनगाव शहरासह परिरसात दुपारी अर्धा तास रिमझिम पाऊस झाला.