जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९०० पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:30 AM2021-03-13T04:30:43+5:302021-03-13T04:30:43+5:30
परभणी : जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९९७ झाली असून, आतापर्यंत ३०० रुग्णांचा कोरोनाने, तर ११ रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू ...
परभणी : जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९९७ झाली असून, आतापर्यंत ३०० रुग्णांचा कोरोनाने, तर ११ रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याची माहिती राज्य स्तरावरील आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोनाच्या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे जिल्हावासीयांची चिंता आता चांगलीच वाढली आहे.
मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. दररोज ३० ते ४० नव्या रुग्णांची नोंद होत असून, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तर ९९७ झाली आहे. त्यामुळे हा संसर्ग आता चिंता वाढवीत आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या तपासण्या मोठ्या संख्येने केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्याही त्याच पटीने वाढत चालली आहे. प्रशासनाने रुग्ण शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, प्रतिबंधात्मक उपाययोजनाही मोठ्या प्रमाणत केल्या जात आहेत. असे असताना हा संगर्ग वाढतच चालला आहे. १० मार्चला राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जाहीर करण्यात आली. त्यात परभणी जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एक हजारच्या जवळ पोहोचल्याने आता कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्याचा मृत्युदर ३.३१ टक्क्यांवर
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. राज्याचा मृत्यू दर २.३४ टक्के एवढा असला तरी परभणी जिल्ह्याचा मृत्युदर मात्र ३.३१ टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार ५७ रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी ३०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याची टक्केवारी ३.३१ टक्के एवढी होते. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने परभणीकरांना चिंता करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या हद्दीत चार हजार रुग्ण
जिल्ह्यात एकूण ९ हजार ५७ रुग्ण असून, त्यापैकी ४ हजार ९१३ रुग्ण महानगरपालिका हद्द वगळून आहेत, तर मनपाच्या हद्दीत ४ हजार १४४ रुग्णसंख्या झाली आहे. मनपाच्या हद्दीत आतापर्यंत १३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मनपा वगळता जिल्ह्यात १६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.