राष्टÑवादीत लोकसभेसाठी इच्छुकांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:16 AM2018-10-07T00:16:44+5:302018-10-07T00:17:17+5:30
लोकसभा निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी बाकी असताना मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत इच्छुकांची संख्या वाढल्याचे पहावयास मिळाले़ यावरून वादावादीही झाल्याचे समजते़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकसभा निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी बाकी असताना मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत इच्छुकांची संख्या वाढल्याचे पहावयास मिळाले़ यावरून वादावादीही झाल्याचे समजते़
लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई येथे शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी पक्षाचे अध्यक्ष खा़ शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आ़ जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आ.सुनील तटकरे, माजीमंत्री फौजिया खान यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती़
यावेळी परभणी लोकसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांची नावे सांगण्याबाबत जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांना आवाहन करण्यात आले़ यावेळी दुर्राणी यांनी पहिल्या क्रमांकावर आ़ विजय भांबळे यांचे तर दुसऱ्या क्रमांकावर माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर यांचे नाव सांगितले़ या दोघांपैकी एकास संधी दिल्यास राष्ट्रवादीचा विजय निश्चित आहे, असे आ़ दुर्राणी म्हणाले़
यावेळी विटेकर यांनीही आपण स्वत: लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले़ या दृष्टीकोणातून आपण तयारी केली असून, संधी दिल्यास परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात खेचून आणू, असे त्यांनी यावेळी सांगितले़
यावेळी माजी खा़ सुरेश जाधव यांनी आपण स्वत: लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले़ याशिवाय माजी खा़ गणेश दुधगावकर यांनीही पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे सांगितले़
माजी महापौर प्रताप देशमुख यांनी मुस्लीम उमेदवारास संधी देण्याची मागणी केली़ तर परभणी महानगराध्यक्ष स्वराजसिंह परिहार यांनी बाळासाहेब जामकर यांच्या नावाची शिफारस केली़ यावेळी उमेदवारीच्या मागणीवरून व शिफारशीवरून बरीच खडाजंगी झाल्याची चर्चा आहे़
शिवसेना-भाजपाच्या युतीवर : बरेच काही अवलंबून
परभणी लोकसभा मतदार संघावर गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे़ प्रत्येक निवडणूक शिवसेनेने भाजपाशी युती करूनच जिंकली आहे़ २०१४ च्या निवडणुकीतही शिवसेनेच्या विजयात भाजपाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे़ आता राज्यस्तरावर शिवसेनेकडून स्वबळाची भाषा केली जात आहे़ त्यामुळे लोकसभा निवडणूक शिवसेना स्वबळावर लढल्यास निकालाचे चित्र वेगळे असू शकते़ भाजपनेही लोकसभा निवडणुकीची तयारी यापूर्वीपासूनच सुरू केली आहे़ या अनुषंगाने पक्षाच्या लोकसभा प्रभारींनी दोन-तीन वेळा कार्यकर्त्यांचे शिबिरेही घेतली आहे़ असे असले तरी शिवसेनेसोबत युती करण्यातच भाजपाला रस आहे़ त्यामुळे २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती होईल, असे राजकीय जाणकारांना वाटते़ त्यामुळे या निवडणुकीत विजय मिळविणे राष्ट्रवादी-काँग्रेसच्या उमेदवारांना सोपे नाही़ सर्व बाजुंनी विचार करूनच राष्ट्रवादीला उमेदवार द्यावा लागणार आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसकडे लोकसभा मतदार संघातील ३ विधानसभा मतदार संघ असून, शिवसेनेकडे फक्त एकच विधानसभा मतदारसंघ आहे़ दोन मतदार संघात सध्या भाजपाचे वर्चस्व आहे़ असे असले तरी लोकसभा निवडणुकीत मात्र नेहमी शिवसेनेचाच वरचष्मा राहिला आहे़ त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीची गणिते मांडताना आघाडीच्या उमेदवारांना बरीच जुळवाजुळव करावी लागणार आहे़