विविध उपक्रमांमुळे पाच वर्षांमध्ये शाळांची पटसंख्या दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 07:24 PM2019-06-18T19:24:49+5:302019-06-18T19:26:25+5:30
वाणी संगम येथील जि.प. शाळेत ६४ वरून झाली १३० विद्यार्थी संख्या
- सुभाष सुरवसे
सोनपेठ (परभणी ) : तालुक्यातील वाणीसंगम येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये २०१३ मध्ये ६४ विद्यार्थी संख्या होती. मात्र त्यानंतर शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे व वाढलेल्या गुणवत्तेमुळे पाच वर्षात येथील जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या १३० वर जाऊन पोहचली आहे.
सोनपेठ शहरापासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने अनेक नवनवीन उपक्रम राबविले आहेत. यात शाळेमध्ये १२ लाख रुपये खर्च करून विज्ञान प्रयोग शाळेची उभारणी करण्यात आली. विशेष म्हणजे या प्रयोगशाळेसाठी प्रशिक्षित शिक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण शाळा ई-लर्निंग झाली आहे. विजेसाठी सोलार सिस्टीम आहे. तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केलेले असून त्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांकडून उन्हाळ्यात ट्रॅक्टरच्या सहाय्याने वृक्षांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शाळेच्या परिसरात निसर्गरम्य वातावरण आहे. त्याच बरोबर गणित व इंग्रजी विषयाकडे विशेष लक्ष दिले जाते. अनेक शैक्षणिक उपक्रमातून मुलांना हसत, खेळत शिक्षण दिल्या जाते. शाळेमध्ये बालवक्ता मंच तयार करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व, कला वाढली आहे. शाळेत मैदानी खेळ, वक्तृत्व, कला, गायन, नाट्य, काव्यलेखन, तंत्रज्ञानाचा अध्यापनात करावयाचा वापर आदी बाबत शिक्षण देण्यात येते. त्यामुळे मुलांना शाळेत आवड निर्माण झाली असून विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थितीही वाढली आहे. विशेष म्हणजे या शाळेत सोनपेठ शहरातील विद्यार्थी प्रवेश घेतल्याचे दिसून येत आहे.
गावची शाळा गावाची ओळख बनावी
गोरगरिब मुलांच्या नशिबी शिक्षणाची श्रींमंती आणण्यासाठी माझ्यासह सर्व शिक्षक, समिती व ग्रामस्थ समाजशील भावनेतून ६ वर्षापासून एकत्रित काम करीत आहेत. चांगल्या कार्यासाठी आम्ही जि.प. शाळा नव्हे तर गावची शाळा गावची ओळख बनावी, यासाठी काम करीत आहोेत, असे माजी मुख्याध्यापक डी.के. पवार यांनी सांगितले.
शाळेचे भविष्यातील उपक्रम
सोनपेठ तालुक्यातील वाणीसंगम येथील जिल्हा परिषद शाळेत बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याच बरोबर १२ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या प्रयोगशाळेत नवनवीन प्रयोग साहित्याचा समावेश करून विद्यार्थ्यांना हाताळण्यास देणार आहेत.
पालक काय म्हणतात?
- मी माझ्या दोन्ही मुलींना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून गावातील शाळेत तीन वर्षापूर्वीच प्रवेश दिला आहे. आज त्यांची भाषा, गणित आणि इंग्रजी विषयासोबतच व्यक्तिमत्त्व विकासात सुधारणा झाली आहे. - रुख्मिणी शेळके
- पालकांची पाल्यांच्या शिक्षणाबाबत संभ्रमावस्था दूर करणारे, शाळेसाठी २४ तास काम करणारे शिक्षक आम्हास मिळाले आहेत. माझ्या मुलासह माझ्या नातेवाईकांचीही मुले या शाळेत आनंदाने शिक्षण घेत आहेत. - रवि वाघमारे
आजची वाढती पटसंख्या व पालकांच्या शिक्षणाविषयी आजच्या बदलेल्या संकल्पना, यासाठी शाळेतील शिक्षक, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या सहकार्याने शाळेच्या प्रगतीचा वाढता आलेख पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत.
- नवनाथ जाधव, मुख्याध्यापक
इंग्रजी शाळेच्या तुलनेत आमच्या शाळेचा दर्जा चांगला आहे. शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाही फायदा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे होत आहे. यापुढेही शाळेत विविध उपक्रम राबविणार.
- संदीपान झिरपे, शालेय समिती