भरपावसात परभणीत ओबीसींचा एल्गार; जनगणना, स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षणाची मागणी
By राजन मगरुळकर | Published: July 18, 2022 08:03 PM2022-07-18T20:03:52+5:302022-07-18T20:04:14+5:30
पाऊस सुरू असताना शहरात सकाळपासून ओबीसी समाजबांधव जिल्ह्यातून तसेच परजिल्ह्यातून दाखल होत होते.
परभणी : स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींच्या आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी सोमवारी ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. भरपावसात निघालेल्या या मोर्चाने परभणीकरांचे लक्ष वेधून घेतले.
शहरातील शनिवार बाजार येथून दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. नानलपेठ, शिवाजी चौक, स्टेशन रोड येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोर्चा दाखल झाला. मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील मार्गदर्शन कार्यक्रमाने झाला. या ठिकाणी मान्यवरांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रमुख चार मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
पाऊस सुरू असताना शहरात सकाळपासून ओबीसी समाजबांधव जिल्ह्यातून तसेच परजिल्ह्यातून दाखल होत होते. हजारोंचा जनसमुदाय मोर्चामध्ये सहभागी झाला होता. मोर्चातील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विविध वेशभूषेतील कलावंत, वादकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. ओबीसी आरक्षण कायम ठेवावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी आरक्षण लागू होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात, मंडळ आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागू कराव्यात, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. निवेदनावर भगवानराव वाघमारे, स्वराजसिंह परिहार, सुरेशराव नागरे, नानासाहेब राऊत, संतोष मुरकुटे, कीर्तीकुमार बुरांडे, किरण सोनटक्के, सुरेश भुमरे, विशाल बुधवंत, रामप्रभू मुंडे, गंगाप्रसाद आनेराव, मोईन मौली, हरिभाऊ शेळके, डॉ. धर्मराज चव्हाण, कृष्णा कटारे, नंदा राठोड, लक्ष्मण बुधवंत, अनंत बनसोडे, अविनाश काळे, साधना राठोड, नंदा बांगर, मनीषा केंद्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
विविध संघटनांनी दिला पाठिंबा
ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चास शहरासह जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला. तसेच या पाठिंब्याचे पत्रही प्रशासनाकडे दिले. या मोर्चातही पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
जिल्हा पोलीस दलाने या मोर्चासाठी शहरात फिक्स पॉईंट तैनात करुन वाहतूक व्यवस्थेची कोंडी होऊ नये म्हणून नियोजन केले. शनिवार बाजार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मुख्य बाजारपेठ या सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे मोर्चा मार्गावर सुद्धा पोलिसांनी गस्त सुरु ठेवली होती.