३४ ग्रामपंचायत ७५ मतदारांचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:13 AM2020-12-09T04:13:19+5:302020-12-09T04:13:19+5:30
१५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला दिला जात असून अनेक आर्थिक तरतुदीसह इतर अधिकार ग्रामपंचायतीस दिले जात आहेत. ...
१५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला दिला जात असून अनेक आर्थिक तरतुदीसह इतर अधिकार ग्रामपंचायतीस दिले जात आहेत. त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकीत स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढत आहे. तर दुसरीकडे सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होण्याऐवजी जुन्या पध्दतीनेच सदस्यांमधून होत असल्याने वार्ड निहाय मतदारांना आत्ता महत्त्व प्राप्त होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वार्डनिहाय मतदार यादी निश्चित करतांना घरांच्या क्रमवारीनेच वार्ड निहाय मतदार यादी १ सप्टेंबर २०१९ रोजी तयार केलेली यादी ६७ ग्रामपंचायतीच्या ठिकाणी १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. या यादीबाबत ७ डिसेंबरपर्यंत आक्षेप दाखल करण्यासाठी मुदत दिली होती. मतदारांचे राहण्याचे ठिकाण व वार्ड रचनेत मतदार यादीत आलेले नाव यामध्ये विसंगती आल्याने ६७ पैकी ३४ ग्रामपंचायतमधील वैयक्तिक व सामूहिक अशा ७५ग्रामस्थांनी एका वार्डातून दुसऱ्या वार्डात नाव सामाविष्ट करून वार्ड रचना पुनश्च करावी, याबाबत तहसील कार्यालय निवडणूक विभागात आक्षेप अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती निवडणूक विभागातील कर्मचारी आ.बा.लोखंडे यांनी दिली आहे.
असे आले सामुदायिक व वैयक्तिक आक्षेप अर्ज
सेलू तालुक्यातील आडगाव दराडे २, गोहेगाव ४, चिकलठाणा बु ४, देऊळगाव गात ६, वालूर ३, खादगाव ९, गुळखंड ३, चिकलठाणा खु २, तिडी पिंपळगाव २,नागठाणा -कुंभारी ५,धनेगाव २,आहेर बोरगाव ५,रायपूर ४,पार्डी २, सिध्दनाथ बोरगाव २,राजुरा २, तर देवगाव फाटा, कान्हड, पिंपरी, मोरेगाव, सिमणगाव, हादगाव खु,शिराळा,निरवाडी बु,गोमेवाकडी,निपानी टाकळी,रोहीणा,केमापुर, नांदगाव, ब्रम्हवाकडी, झोडगांव,राजा,सावंगी, ब्राम्हणगाव येथील प्रत्येकी १ अशा प्रकारे ३४ गावातून ७५ आक्षेप अर्ज आले असून दोन दिवसात हे आक्षेप निकाली काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.
तहसील कार्यालयास प्राप्त झालेल्या ७५ आक्षेपाची मंडल अधिकारी, तलाठी यांच्या मार्फत पडताळणी करुन योग्य प्रमाणात दुरूस्ती करून सर्व आक्षेप दोन दिवसात निकाली काढण्यात येतील. त्यानंतर ६७ ग्रामपंचायतीची १० डिसेंबर रोजी वार्ड निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावयाची आहे.
प्रशांत थारकर,नायब तहसीलदार, सेलू
एकूण निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती ६७
एकूण वार्ड संख्या २०५
निवडुण द्यावयांची सदस्य संख्या ५१९