सौर कृषी पंपासाठी शेतकऱ्यांची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:18 AM2021-02-16T04:18:55+5:302021-02-16T04:18:55+5:30
परभणी : शाश्वत वीज पुरवठा मिळविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सौर कृषीपंप योजनेत वीज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याची ...
परभणी : शाश्वत वीज पुरवठा मिळविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सौर कृषीपंप योजनेत वीज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याची तक्रार आ. बाबाजानी दुर्राणी यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर वीज वितरण कंपनीतील अधिकारी किरकोळ कारणावरून हा अर्ज फेटाळून लावत आहेत. ज्या कागदपत्रांची पूर्तता झाली नाही त्या कागदपत्रांची पूर्तता तालुकास्तरावर शिबिरे घेऊन करून घेतली जाऊ शकते. मात्र, असे न करता अधिकारी चक्क टाळाटाळ करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत पैसे भरून एक वर्षाचा कालावधी उलटला तरीही त्यांना सौरपंप बसविण्यात आला नाही. कोणताही कार्यक्रम जाहीर न करता सौरपंप वाटप केले जातात. त्यामुळे या योजनेत मनमानी सुरू आहे. केवळ उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि कंत्राटदारांना सबसिडी मिळवून देण्यासाठी सौर कृषी पंप जोडणीचा फार्स जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. तेव्हा वंचित शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देणे, नामंजूर अर्जांच्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी शिबिरे घेणे, अर्ज मंजुरीचे प्रमाण वाढविणे या मुद्द्यांवर चौकशी करावी, अशी मागणी आ.दुर्राणी यांनी केली आहे.