२५ हजार रुपयांची लाच घेताना कार्यालयीन अधीक्षकास पकडले
By admin | Published: February 22, 2017 07:21 PM2017-02-22T19:21:00+5:302017-02-22T19:21:00+5:30
भाडेतत्त्वावर दिलेल्या नगरपालिकेच्या जागेचा अंतिम आदेश काढण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कार्यालयीन अधीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
गंगाखेड (जि. परभणी) : भाडेतत्त्वावर दिलेल्या नगरपालिकेच्या जागेचा अंतिम आदेश काढण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कार्यालयीन अधीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी १० वाजता रंगेहाथ पकडले. गंगाखेड शहरातील योगेश्वर कॉलनीत ही कारवाई करण्यात आली.
गंगाखेड नगरपालिकेची मोकळी जागा भाडेतत्त्वावर घेणाऱ्या शेख रसूल यांना अंतिम आदेश देण्यासाठी पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक श्यामकांत काळे यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीनंतर २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.५६ वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गंगाखेड शहरातील योगेश्वर कॉलनीत श्यामकांत काळे यांच्या घरी सापळा लावला. या प्रसंगी तक्रारदाराकडून २५ हजार रुपये स्वीकारताना काळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक एन.एन. बेंबडे, पोलिस निरीक्षक अनिल गव्हाणकर, पोलिस कर्मचारी लक्ष्मण मुरकुटे, शिवाजी भोसले, अविनाश पवार, श्रीकांत कदम, चालक भालचंद्र बोके यांच्या पथकाने केली.