पालम तहसील कार्यालयात अधिकारी आणि पुढाऱ्यांमध्ये खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 05:17 PM2020-02-20T17:17:12+5:302020-02-20T17:17:38+5:30
गोंधळ वाढत गेल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पालम : तहसील कार्यालयामध्ये जनतेचे प्रश्न घेऊन आलेले राजकीय पुढारी व तहसीलदार ज्योती चव्हाण यांच्यात खडाजंगी उडाल्याची घटना गुरुवारी ( दि. २० ) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. यासोबतच नागरिकांसोबत नायब तहसीलदार इंदुरीकर याने हमरीतुमरी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोरवड येथील शौचालय बांधकामासाठी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूलच्या कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयात आणून लावला आहे. याप्रकरणी दंड भरण्यास तहसील कार्यालयात आलेले रासपाचे नेते सिताराम राठोड आणि तहसीलदार ज्योती चव्हाण यांच्यात चांगलीच खडाजंगी उडाली . तसेच कर्मचाऱ्यांनीसुद्धा राठोड यांच्यासोबत हुज्जत घातली. हा प्रकार भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य गणेशराव रोकडे यांना समजताच तेही कार्यालयात दाखल झाले.
या दरम्यान, वादावर चर्चा चालू असताना नायब तहसीलदार मंदार इंदुरीकर यांनी नागरिकांसोबत हमरीतुमरी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या पुढारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारल्याने कार्यालयांमध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, काही दिवसांपासून पालम तहसील कार्यालयात समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कार्यालयात अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांच्यात खटके उडण्याच्या घटना वाढत असल्याची चर्चा आहे.