चिखलमय रस्त्याने काढला अधिकाऱ्यांचा घाम; पाहणीसाठी आलेल्या तहसीलदारांची गाडी चिखलात फसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 01:14 PM2021-07-01T13:14:14+5:302021-07-01T13:23:23+5:30
गावकऱ्यांच्या यातना या अधिकाऱ्यांना प्रत्यक्षपणे अनुभवायला मिळाल्या. तीन किलोमीटर प्रवास करीत अखेर गावात अधिकाऱ्यांचा फौजफाटा दाखल झाला.
पूर्णा (परभणी ) : तालुक्यातील माहेर गावचा मुख्य रस्ता पाहण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रस्ता नसल्याने मंगळवारी ( दि 29 ) तीन किलोमीटर चिखल दगडाच्या रस्त्यातून पायी प्रवास करावा लागला. यावेळी तहसीलदारांची गाडी चिखलात फसल्याने चक्क ट्रॅक्टर लावून बाहेर काढावी लागली. ग्रामस्थांच्या रोजच्या जीवघेण्या समस्यांचा प्रत्येक्ष अनुभव यावेळी अधिकाऱ्यांना आला.
ताडकळस परिसरात असलेल्या माहेर या गावच्या रस्त्याचा प्रश्न काही दिवसापूर्वी चव्हाट्यावर आला होता. या रस्त्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळ यांनी दखल घेतली. गावाला भेट घेऊन त्यांनी विविध समस्या जाणून घेतल्या. तालुकास्तरीय सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थित 29 जून रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेसाठी जिल्हा परिषदचे उप कार्यकारी मुख्यधिकरी ओम प्रकाश यादव, तहसीलदार पल्लवी टेमकर, गटविकास अधिकारी अमित राठोड, आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा साबळे, कार्यकारी अभियंता यमडवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी वानखेडे, तालुका कृषी अधिकारी तांबिले, विस्ताराधिकारी सूरेवाड, तलाठी अमदुरे यांच्यासह महावितरण आरोग्य विभागाचे अधिकारी माहेर गावाच्या दिशेने सकाळी निघाले. मात्र, गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा गावापासून तीन किलोमीटर अलीकडेच थांबवावा लागला.
गावात जाणारा मुख्यरस्ता हा चिखलमय असल्याने वाहने पुढे जाऊ शकत नव्हते. याच रस्त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना तहसीलदार पल्लवी टेमकर यांची गाडी चिखलात फसली होती. काही वेळाने गावकऱ्यांच्या मदतीने ट्रॅक्टरच्या सहय्याने त्यांची गाडी बाहेर काढावी लागली. ग्रामसभेसाठी आलेल्या सर्वच अधिकाऱ्यांना तीन किलोमीटरचा चिखल दगडांचा रस्ता तुडवत माहेर गावामध्ये प्रवेश करावा लागला. गावकऱ्यांच्या यातना या अधिकाऱ्यांना प्रत्यक्षपणे अनुभवायला मिळाल्या. तीन किलोमीटर प्रवास करीत अखेर गावात अधिकाऱ्यांचा फौजफाटा दाखल झाला. गावकऱ्यांच्यावतीने उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत करून ग्रामसंवाद कार्यक्रमास सुरुवात झाली. ग्रामस्थांनी प्रमुख रस्त्याच्या मागणीसह पेयजल योजना, शाळा दुरुस्ती, स्वच्छता, आरोग्य सुविधा, अखंडित वीज पुरवठा याची मागणी केली. गावकऱ्यांना लवकरात लवकर सुविधा पुरवण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.
ग्रामसभा संपताच वीजपुरवठा खंडित
माहेर गावाच्या रस्त्यासोबतच या गावातील वीजपुरवठा प्रश्नही महत्त्वाचा आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ग्रामसभेच्या दिवशी दिवसभर सुरळीत सुरू असलेला वीज पुरवठा अधिकारी गावाबाहेर जाताच खंडित करण्यात आला.