ऑफलाईन अर्जांची प्रक्रिया ठरली किचकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:12 AM2021-01-01T04:12:19+5:302021-01-01T04:12:19+5:30
पाथरी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची मुभा निवडणूक आयोगाने शेवटच्या टप्प्यात दिली खरी; मात्र आयोगाकडून दोन वेळा ...
पाथरी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची मुभा निवडणूक आयोगाने शेवटच्या टप्प्यात दिली खरी; मात्र आयोगाकडून दोन वेळा ऑफलाईन अर्जात बदल केल्याने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आणखी किचकट झाली असून पॅनल प्रमुख आणि उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडत आहे.
कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे ६ ते ७ महिने रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. सरपंच पदाच्या आरक्षणाचा विषय असो की निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात सुरू असलेला गोंधळ असो हा विषय सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा बनला आहे. सुरुवातीला निवडणूक आयोगाने सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले. त्यानंतर राज्य शासनाने रद्द केले. २३ डिसेंबरपासून ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी साईटमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तासभर वाट पाहत बसावे लागले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस अगोदर ऑफलाईन अर्ज भरण्यास आयोगाने परवानगी दिली. त्यामुळे संभाव्य उमेदवारांना दिलासा मिळण्याऐवजी अधिकच गोंधळ उडाला आहे.
२९ डिसेंबर रोजी आयोगाकडून उपलब्ध करून दिलेला अर्जामध्ये बदल करून रात्री उशिरा नवीन स्वरुपात अर्ज उपलब्ध करून दिला. तोपर्यंत अनेकांचे जुने अर्ज भरून झाले होते. ३० डिसेंबर रोजी पुन्हा उमेदवार यांची धावपळ सुरू झाली. आता पुन्हा नव्याने अर्ज भरावा की जुनाच दाखल करावा, असा गोंधळ दिवसभर तहसील कार्यालयात पहावयास मिळाला.
खर्चही वाढला
पाथरी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्यात ३७० सदस्य निवडून येणार आहेत. ऑनलाईनच्या घोळात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. अनेक वेळा कागदपत्रे बदलली जात आहेत. त्यामुळे खर्चाचा भार अधिक पडला जात आहे.