बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध जखमी; जिंतूर तालुक्यातील कवठा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 04:23 PM2018-06-25T16:23:52+5:302018-06-25T16:25:01+5:30
बिबट्याच्या हल्ल्या ६५ वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील कवठा येथे आज सकाळी ६.३० च्या सुमारास घडली. जखमीवर परभणी येथे उपचार करण्यात येत आहेत.
परभणी : बिबट्याच्या हल्ल्यात ६५ वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील कवठा येथे आज सकाळी ६.३० च्या सुमारास घडली. जखमीवर परभणी येथे उपचार करण्यात येत आहेत. तर बिबट्या एका झुडूपात दबा धरून बसला असून ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत.
जिंतूर तालुक्यातील कवठा येथील लक्ष्मण विश्वनाथ वाकळे (वय ६५) हे आज सकाळी ६.३० च्या सुमारास तलावावर पाणी आणण्यासाठी गेले होते. पाणी आणत असताना अचानक त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. यावेळी त्यांनी प्रतिकार केला असता बिबट्या तेथून पळून गेला. याचवेळी त्यांच्या आवाजामुळे काही ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. यानंतर वाकळे यांना उपचारासाठी येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले.
दरम्यान,वाकळे यांच्या माहितीवरून ग्रामस्थांनी बिबट्याचा शोध सुरु केला. यावेळी बिबट्या एका झुडूपामध्ये दबा धरून बसलेला दिसला. ग्रामस्थांनी याची माहिती पोलीस प्रशासन व वन विभागाला दिली. मात्र एक वनरक्षक वगळता वन विभागाचे इतर अधिकारी दुपारी २.३० वाजेपर्यंत येथे दाखल नव्हती. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच चालत्या जीपमधून त्यांनी झुडूपाकडे धाव घेत बिबट्या आहे की, नाही? याची माहिती घेतली. यावरून त्यांनी झुडूपामध्ये प्राणी असून हा प्राणी बिबट्या आहे का नाही? हे सांगता येणार नाही. वन विभागाचे अधिकारीच आल्यानंतर हा प्राणी बिबट्या असल्याचे स्पष्ट होईल, असे रामोड सांगितले.