अरे बापरे! भररस्त्यातील विद्युत रोहित्राने अचानक घेतला पेट; परभणीच्या साई कॉर्नर येथील घटना
By राजन मगरुळकर | Published: April 13, 2023 02:45 PM2023-04-13T14:45:38+5:302023-04-13T14:46:00+5:30
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.
परभणी : शहरातील अपना कॉर्नर ते खंडोबा बाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर साई कॉर्नर येथे रस्त्याच्या लगत असलेल्या एका विद्युत रोहित्राने पेट घेतल्याची घटना आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही वेळातच ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.
परभणी शहरातील मुख्य वसाहत असलेल्या अपना कॉर्नर ते खंडोबा बाजार रस्त्यावर साई कॉर्नर परिसर आहे. येथे झाडाच्या बाजूला एका मेडिकल शेजारी महावितरणचे विद्युत रोहित्र आहे. या विद्युत रोहित्राला आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग हळूहळू वाढत गेली. सदरील प्रकार परिसरातील नागरिक व रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळविला. त्यावरून परभणी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी दीपक कानोडे, वाहन चालक संतोष पोंदाळ हे वाहनासह घटनास्थळी दाखल झाले.
परभणी: भररस्त्यातील विद्युत रोहित्राने अचानक घेतला पेट; साई कॉर्नर येथील घटना pic.twitter.com/JBuIjxATIX
— Lokmat (@lokmat) April 13, 2023
आगीचे कारण अस्पष्ट
आग तत्काळ नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाने पाण्याचा फवारा करून काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.