पत्रकार प्रवीण मुळी हल्ला प्रकरणात एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 05:21 PM2019-06-05T17:21:48+5:302019-06-05T17:24:12+5:30
आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून पूर्वी त्याच्यावर विविध पोलिस स्थानकात पाच गुन्हे दाखल आहेत.
जिंतूर (परभणी ) : येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी यांच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रशांत मुळी व प्रवीण मुळी यांच्या घरावर 27 मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रात घटनेचे पडसाद उमटल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाच्या मुळाशी जात तपास केला. ठोस माहिती आणि पुराव्यावरून पोलिसांनी अनिल देविदास वाकळे यास ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
संशयित आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून पूर्वी त्याच्यावर विविध पोलिस स्थानकात पाच गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी येलदरी येथील मारूती मंदिराची साऊंड सिस्टिमची चोरी वाकळे याने केल्याचे पत्रकार प्रवीण मुळी यांनी उजेडात आणले होते. तसेच येलदरी येथील एका मोठ्या चोरीच्या प्रकरणाची माहिती सुद्धा मुळी यांना होती. यातूनच वाकळे याने हे कृत्य केले असावे असा पोलिसांचा कयास आहे. वाकळे सोबत आणखी कोणी होते का याचा पोलिस शोध घेत असून इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस ए शेख, पोलीस शिपाई पी एस तुपसुंदर , राजेश सरोदे ,व्यकटेश नरवाडे आदींनी केली.