महाआवास अभियानाबाबत एक दिवसीय कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:14 AM2020-12-23T04:14:01+5:302020-12-23T04:14:01+5:30
पंचायत समिती अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेतील प्रलंबित असलेल्या घरांची कामे पूर्ण करून घेत तालुका ...
पंचायत समिती अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेतील प्रलंबित असलेल्या घरांची कामे पूर्ण करून घेत तालुका स्तरावर दिलेले घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यानच्या १०० दिवसांत महाआवास अभियान राबविले जात आहे. यात प्रलंबित घरकुलांचा आढावा घेऊन अर्धवट असलेल्या घरकुलांची कामे पूर्ण करणे, भूमिहीन घरकूल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देणे, उद्दिष्टाप्रमाणे घरकुलांचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात सादर करून त्यास तत्काळ मंजुरी देऊन बांधकाम सुरू करणे, शासकीय योजनांचा कृती संगम तयार करून घरकूल लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, संगणक ऑपरेटर यांची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यशाळेस तहसीलदार स्वरूप कंकाळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक ए. बी. पाटमासे, उपअभियंता वसेकर, स्वच्छ भारत अभियानचे मुशीर हाश्मी, विस्तार अधिकारी जगन्नाथ भालेराव, एस. व्ही. मुंडे, दिनेश दुधाटे, कवडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन महादेव काडवदे यांनी केले तर आभार अभिजित सोमवंशी यांनी मानले.