सर्पदंशानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:23 PM2019-12-27T12:23:17+5:302019-12-27T12:24:37+5:30
डॉक्टरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रूग्णालयात आंदोलन
येलदरी (जि. परभणी) : सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मारुती उत्तमराव वाकळे (३८) यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आंदोलन केले़ अखेर सायंकाळी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला़
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, येलदरी येथील मच्छीमार मारुती उत्तमराव वाकळे यांना २५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता सापाने चावा घेतला़ त्यानंतर नातेवाईकांनी त्यास तातडीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले़ मात्र आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास घुगे मुख्यालयी नव्हते. त्यामुळे मारुतीवर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत़ त्यामुळे येलदरी येथून त्यांना जिंतूर येथे नेण्यात आले़ तेथेही उपचार झाले नाहीत़ पुढे परभणी येथे नेत असताना मारुती यांचा वाटतेच मृत्यू झाला़ त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, तीन मुले असा परिवार आहे़ मारूती यांच्या मृत्यूने कुटुंबाचा आधार गेला आहे.
आश्वासनानंतर मृतदेह घेतला ताब्यात
दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी़, या मागणीसाठी २६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नातेवाईक व गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात ठिय्या मांडला़ त्यामुळे तणाव निर्माण झाला. प्राथमिक आरोग्य केंद्रात अनुपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ़ श्रीनिवास घुगे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला जाईल़ तसेच मुख्यालयी राहणारे वैद्यकीय अधिकारी दोन-तीन दिवसांत देण्यात येतील, असे लेखी आश्वासन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ दिनेश बोराळकर यांनी दिले़ त्यानंतर दीड तासानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला़