१४ हजार ४३० रुग्णांमागे एक डॉक्टर; मराठवाड्यात आरोग्य सेवेतील विषमता चव्हाट्यावर
By मारोती जुंबडे | Updated: January 11, 2025 16:08 IST2025-01-11T16:07:28+5:302025-01-11T16:08:14+5:30
परभणीत ३६ टक्के डॉक्टरांची कमतरता, लेखापरीक्षण अहवालात ओढले ताशेरे

१४ हजार ४३० रुग्णांमागे एक डॉक्टर; मराठवाड्यात आरोग्य सेवेतील विषमता चव्हाट्यावर
परभणी : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा विचार केला तर जिल्ह्यात मनुष्यबळाअभावी आरोग्य व्यवस्था पांगळी बनू लागली आहे. जिल्ह्यात १४ हजार ४३० रुग्णांमागे एक डॉक्टर असे गुणोत्तर प्रमाण आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर अन् गुणवत्तापूर्ण उपचार मिळणार कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनानंतर आरोग्य सेवेचे महत्त्व प्रत्येक नागरिकाला कळले आहे. त्याचबरोबर शासनाकडूनही आरोग्य सेवेच्या बाबतीत कठोर पावले उचलून सोयी-सुविधांसह मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, ४३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, दोन उपजिल्हा रुग्णालये व सात ग्रामीण रुग्णालयांसह २०९ प्राथमिक उपकेंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांमध्ये मागील काही दिवसांपासून सोयीसुविधा उपलब्ध होत असताना दुसरीकडे मनुष्यबळाचा तुटवडा मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था २०२४ चा लेखापरीक्षण अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालातून मराठवाड्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेतील मनुष्यबळाच्या कमतरतेची विषमता चव्हाट्यावर आली आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यात ९ हजार १८९ लोकसंख्येमागे एक डॉक्टर मंजूर पदाचे गुणोत्तर आहे. परंतु, प्रत्यक्षात १४ हजार ४३० लोकसंख्येमागे एक डॉक्टर उपलब्ध आहे. त्यामुळे ही आरोग्य सेवा देताना उपलब्ध मनुष्यबळाला मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
मराठवाड्यातील उपलब्ध डॉक्टरांची स्थिती
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था २०२४ चा लेखापरीक्षण अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यात परभणी जिल्ह्यात १४ हजार ४३० लोकसंख्येमागे एक डॉक्टर आहे. त्याचबरोबर बीड ९२४७, जालना १४१९७, छत्रपती संभाजीनगर ९२६२, हिंगोली १२०५४, नांदेड ११३३३, लातूर ९६१० तर धाराशिव जिल्ह्यामध्ये ११५६२ लोकसंख्येमागे एक डॉक्टर आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा विचार केला तर परभणी जिल्ह्यात प्रशासकीय व राजकीयदृष्ट्या अनास्था दिसून येत आहे.
परभणीत ३६ टक्के डॉक्टरांची कमतरता
कोरोना व आता नव्याने उद्भवलेल्या एचएमपीव्ही या आजाराचा विचार केला तर आपली आरोग्य व्यवस्था सक्षम आहे का? हे ही पाहणे महत्त्वाचे आहे. भौतिक सुविधा वाढल्या असल्या, तरीही जिल्ह्यात डॉक्टरांची मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपेक्षा सर्वाधिक कमतरता परभणीत आहे. यात परभणी ३६ टक्के, बीड १४ टक्के, जालना १२ टक्के, छत्रपती संभाजीनगर २१ टक्के, हिंगोली १७ टक्के, नांदेड २४ टक्के, लातूर २१ टक्के तर धाराशिव जिल्ह्यामध्ये २९ टक्के डॉक्टरांची कमतरता असल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.