एक लाख १७ हजार मुलांना मिळणार मोफत दोन गणवेश
By ज्ञानेश्वर भाले | Published: May 25, 2024 04:42 PM2024-05-25T16:42:29+5:302024-05-25T16:42:39+5:30
शालेय शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या मुला-मुलींना प्रत्येकी दोन गणवेश मिळणार असून त्यापैकी एक स्काऊट गाइडशी अनुरूप तर दुसरा गणवेश आकाशी रंगाचा शर्ट, गडद निळ्या रंगाची पँट देण्यात येणार आहे.
परभणी : समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहेत. येत्या १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने त्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्यांना गणवेश कसे देता येतील, त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख १७ हजार ३०२ विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ मिळणार आहे.
शालेय शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या मुला-मुलींना प्रत्येकी दोन गणवेश मिळणार असून त्यापैकी एक स्काऊट गाइडशी अनुरूप तर दुसरा गणवेश आकाशी रंगाचा शर्ट, गडद निळ्या रंगाची पँट देण्यात येणार आहे. मुलींना आकाशी रंगाचा शर्ट, निळ्या रंगाचा स्कर्ट तर आठवीतील मुलीना पंजाबी ड्रेस गणवेश मिळेल. विद्यार्थ्यांना गणवेशाची शिलाई स्थानिक पातळीवरील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अधिनस्त असलेल्या महिला गटांच्या माध्यमातून करण्याचे निर्देश आहेत. या गणवेशाच्या शिलाईसाठी संबंधितांना प्रति गणवेश ११० रुपयांप्रमाणे मोबदला मिळणार आहे. यासाठी समिती गठीत करण्यात आली असून यात अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी तर सदस्यपदी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा प्रतिनिधी, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या ५ शाळांतील मुख्याध्यापक, लोक संचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापकांचा समावेश आहे.
मोफत बुटांसह पायमोजेही मिळणार
गत शैक्षणिक वर्षापासून शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बुटासह पायमोजे शालेय व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येत आहेत. यात प्रति विद्यार्थ्यांना बुटांसह पायमोज्यांसाठी १७० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षापासून संबंधित सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील एक हजार १३१ शाळांचा समावेश
समग्र शिक्षा अभियानांतर्गत आगामी शैक्षणिक वर्षांत जिल्ह्यातील एकूण १ हजार १३१ शाळेतील एक लाख १७ हजार ३०२ विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्याचे नियोजन आहे. यात ५६ हजार ६४९ मुली तर ६० हजार ६५३ मुलांचा समावेश आहेत. या अभियानांतर्गत जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक २२२ शाळांचा समावेश असून त्या पाठोपाठ परभणी ग्रामीण १६२, गंगाखेड १४९, सेलू ११२, पूर्णा ११२, पाथरी १०३, पालम १०१, सोनपेठ ८७, मानवत ७२ तर परभणी शहरातील ११ अशा एक हजार १३१ शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश जिल्हा परिषदेच्या यंत्रणेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणवेश देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शाळा, तालुकानिहाय विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांना नियोजित वेळेत कसा गणवेश मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
- सुनील पोलास, शिक्षणाधिकारी प्रा. जिल्हा परिषद