जिंतूरमध्ये जुगाऱ्यांकडून एक लाखाचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 07:54 PM2019-01-17T19:54:37+5:302019-01-17T19:55:48+5:30
आरोपींविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
परभणी : अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली असून जिंतूर तालुक्यात बुधवारी (दि.१६) रात्री स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिंतूर तालुक्यामध्ये जुगार सुरु असल्याची माहिती स्थागुशाच्या पथकाला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी जिंतूर शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागील बाजुस असलेल्या माळावर एका झोपडीत तिर्रट नावाचा जुगार सुरु असताना त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी सात जण जुगार खेळत होते. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून रोख ३२ हजार ८५० रुपये, तीन मोटारसायकल असा १ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सातही आरोपींविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
जिंतूर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात पोलिसांनी छापा टाकला. यावेळी नारायण गुणाजी गायकवाड (रा.निवळी खु.) यास जुगाराच्या साहित्यासह पकडण्यात आले. इटोली बसस्थानक परिसरात तितली भोवरा चालक संतोष शंकरराव वाघ (रा.इटोली) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींकडून २ हजार ६७० रुपये व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश डोंगरे, सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे, कैलास कुरवारे, हनुमंत जक्केवाड, निलेश भूजबळ, संजय शेळके, जमीर फारोखी, सय्यद मोबीन, यशवंत वाघमारे, अरुण कांबळे, किशोर चव्हाण, सय्यद मोईन, परमेश्वर शिंदे आदींनी केली.