एकाच रात्रीत चोरट्यांनी न्यायाधीशाच्या घरासह तीन घरे फोडली; गंगाखेड येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 06:37 PM2018-05-21T18:37:31+5:302018-05-21T18:37:31+5:30
न्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थानासह चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री तीन ठिकाणी धाडसी चोरी केली.
गंगाखेड (परभणी ) : न्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थानासह चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री तीन ठिकाणी धाडसी चोरी केली. यात रोख रक्कम व मुद्देमालासह अंदाजे पाच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. एकाच रात्री चार घरे चोरट्यांनी फोडल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गंगाखेड शहरात चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या असुन दर चार आठ दिवसांत एक तरी चोरीची घटना शहरात घडत आहे. रविवारी मध्यरात्री २ वाजेच्या दरम्यान सुट्टीत बाहेरगावी गेलेल्या अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वरिष्ठ स्तर न्यायाधीश जे.पी. शिराळे यांचे न्यायालय परिसरातील शासकीय निवासस्थान चोरट्यांनी फोडून १५ हजाराचा ऐवज लुटला. यानंतर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पी.टी. देशमुख यांचे निवासस्थानसुद्धा फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, यात ते यशस्वी ठरले नाही. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा मोर्चा बळीराजा कॉलनीकडे वळवला. येथे वामन रंगराव डोंगरे, मारोती एकनाथ उबाळे, मारोती रामकीशन गरड यांच्या घरांचे कुलूप तोडत रोख रक्कम आणि लाखोचा ऐवज लुटून नेला.
यावेळी रात्र गस्तीवर असलेले न्यायालयातील सेवक नामदेव कनिराम राठोड व एका पोलीस कर्मचाऱ्याच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी याची माहिती न्यायाधीश दुबाळे यांना दिली. यानंतर पोलीस निरीक्षक सोहन माछरे, पोउपनि राहुल बहुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी श्वान पथक व फिंगर प्रिंट पथकाच्या मदतीने तपास सुरु केला आहे. शहरात एकाच रात्रीत न्यायाधीशाच्या घरासह तीन घरे चोरट्यांनी लुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.