दोन दुचाकी, ट्रॅक्टरच्या तिहेरी अपघातात एकजण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 05:14 PM2020-08-29T17:14:28+5:302020-08-29T17:23:21+5:30
याप्रकरणी दुचाकी चालकासह ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गंगाखेड: शहराजवळील परळी रस्त्यावर झालेल्या दोन दुचाकी व ट्रॅक्टरच्या तिहेरी अपघातात एक जण जागीच ठार तर एक जखमी झाला. हा अपघात शनिवार ( दि. २९ )दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी दुचाकी चालकासह ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शहरापासून जवळच असलेल्या परळी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून शहराकडे परत येत असलेल्या दुचाकी क्रमांक एमएच २२ एल ८३२४ या दुचाकीला समोरून येत असलेल्या दुचाकी क्रमांक एमएच २२ डब्ल्यू ०८११ च्या चालकाने कट मारला यात दोन्ही दुचाकिंचा अपघात होऊन एक दुचाकी रस्त्यावर मध्यभागी व दुसरी दुचाकी रस्त्याच्या कडेला पडली. याचवेळी परळी रस्त्याने पाठीमागून भरधाव वेगात येत असलेल्या ट्रॅक्टरने दोघांना चिरडले. यात किरण पंढरीनाथ कदम ( २२,रा. भगवती नगर, गंगाखेड ) व किरण बाबुराव कदम (२५, रा. गोपा ता. गंगाखेड ) हे दोघे गंभीर जखमी झाले.
ई-पासची सक्ती उठवली तरच मनुष्यबळाचा प्रश्न सुटेल #coronavirus#MIDC https://t.co/J3OoXdtMDZ
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 29, 2020
याचवेळी परळी रस्त्यावर श्रीगणेश मूर्ती विसर्जन स्थळाची पाहणी करून परळी रस्त्याने शहरात येत असलेल्या उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी लंजीले, तहसीलदार स्वरूप कंकाळ, अतुल तुपकर यांनी अपघात स्थळावर पडलेल्या दोन्ही जखमींना एका ऑटोमध्ये टाकून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी किरण कदम यास तपासून मृत घोषित केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव मुंडे, परिचारिका माला घोबाळे, संगीता केंद्रे, सदाशिव लटपटे यांनी जखमीवर प्रथमोपचार केले.
अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक वाय. एन. शेख, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोगरे, ग्यानबा बेंबडे, सुग्रीव सावंत, कृष्णा तंबूड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त ट्रॅक्टर व एक दुचाकी ताब्यात घेतली तर एम एच २२ डब्ल्यू ०८११ या दुचाकींचा चालक दुचाकीसह पसार झाला आहे.