संस्थाचालकाच्या त्रासाला कंटाळून एकाची शाळेतच आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:23 AM2021-09-17T04:23:01+5:302021-09-17T04:23:01+5:30
नारायण ऊर्फ लक्ष्मण किसनराव पवार (३७) असे मयताचे नाव आहे. नांदेड येथील संस्थाचालक विठ्ठल संभाजी गुट्टे यांची शेखराजूर येथे ...
नारायण ऊर्फ लक्ष्मण किसनराव पवार (३७) असे मयताचे नाव आहे. नांदेड येथील संस्थाचालक विठ्ठल संभाजी गुट्टे यांची शेखराजूर येथे अंध व मूकबधिर शाळा आहे. त्यावर नारायण पवार यांना सेवक व त्यांची पत्नी स्वाती पवार (३२) यांना स्वयंपाकी म्हणून नोकरीवर घेण्याचे आमिष संस्थाचालकाने दाखविले. त्याबदल्यात पवार यांनी स्वतःची दीड एकर जमीन शाळेसाठी दान दिली. त्यानंतर गुट्टे यांनी पवार दांपत्यास नोकरी दिली नाही. दरम्यान, त्याची तक्रार करूनही न्याय मिळाला नाही. म्हणून पवार दडपणाखाली वावरत होते. याच विवंचनेत असताना १६ सप्टेंबर रोजी सकाळी नारायण पवार यांनी शाळेतच गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी मयताची पत्नी स्वाती पवार यांच्या फिर्यादीवरून संस्थाचालक विठ्ठल गुट्टे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे तपास करीत आहेत.
मयताच्या खिशात आढळली चिठ्ठी
मयत पवार यांच्या खिशात चिठ्ठी आढळली आहे. त्यात ‘मी नारायण पवार आत्महत्या करीत आहे. कारण विठ्ठल संभाजी गुट्टे, या संस्थाचालकाने मला नोकरीला लावतो, असे म्हणून २००६ मध्ये माझी दीड एकर जमीन घेतली आणि मला नोकरीला लावले नाही. माझ्यावर उपासमारीची वेळ आणली, माझी जमीन शासनाने परत मिळवून द्यावी, ही माझी शेवटची विनंती’, असा मजकूर नारायण पवार यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला आहे.