जिल्ह्यात केवळ १६ टक्केच पीक कर्जाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:13 AM2021-06-18T04:13:43+5:302021-06-18T04:13:43+5:30
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयीकृत बँकांना १२१३ कोटी २२ लाख रुपयांचे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँकांना ...
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयीकृत बँकांना १२१३ कोटी २२ लाख रुपयांचे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँकांना दिले होते. परंतु, १७ जूनपर्यंत केवळ १६ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. अद्यापही जवळपास ८५ टक्के पीक कर्ज वाटप बाकी आहे. जिल्ह्यातील व्यावसायिक बँकांना ७८१ कोटी ५८ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, या बँकांनी आतापर्यंत केवळ ४ हजार ९३२ शेतकऱ्यांना ४७ कोटी ४५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यानंतर खासगी बँकांना १०१ कोटी १८ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले असताना या बँकांनी आतापर्यंत केवळ ३३१ शेतकऱ्यांना ३ कोटी ८३ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करत १७ जूनपर्यंत ३ टक्केच पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बँकेने बँकेला १८७ कोटी ६३ लाख रुपयांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट असताना खरीप हंगामाची पेरणी संपत आलेली असतानाही २ हजार १६० शेतकऱ्यांना आतापर्यंत १८ कोटी ९० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे, तर दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या वतीने शाखेला १४२ कोटी ८३ लाख रुपये उद्दिष्ट या खरीप हंगामात देण्यात आले आहे. आतापर्यंत या बँकेने ३४ हजार ४१२ शेतकऱ्यांना १२४ कोटी ८७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत सर्वाधिक ८७ टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. १७ जूनपर्यंत जिल्ह्यात १ हजार ८३५ शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ १९५ कोटी ५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना याहीवर्षी उसनवारी करूनच आपली पेरणी पूर्ण करावी लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन पीक कर्ज वाटपासाठी प्रत्येक बँकेत स्वतंत्र खिडकी योजना सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे,
बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँकेकडून कानाडोळा
यावर्षीच्या खरीप हंगामात व्यावसायिक बँकांमध्ये आत्तापर्यंत एसबीआय बँकेने ३ हजार ९४२ शेतकऱ्यांना ३६ कोटी ८५ लाख रुपयांचे वाटप केले आहे, तर दुसरीकडे बँक ऑफ इंडियाने केवळ ७ शेतकऱ्यांना ६ लाख रुपयांचे वाटप केले आहे. त्यामुळे व्यावसायिक बँकांमध्ये बँक ऑफ इंडियाकडून पीक कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खासगी बँकांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक आयडीबीआय बँकेने १६५ शेतकऱ्यांना १ कोटी ५ लाख रुपयांचे वाटप केले आहे. एचडीएफसी बँकेने आतापर्यंत केवळ एका शेतकऱ्याला ७ लाख रुपयांचे वाटप केले आहे. त्यामुळे व्यावसायिक बँकेमध्ये बँक ऑफ इंडिया तर खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक पीक कर्ज वाटपाकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे.