'....खात्यावर फक्त २६ रुपये आहेत'; पीक विम्यासाठी उद्विग्न शेतकऱ्याचा झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:58 PM2019-11-18T12:58:46+5:302019-11-18T13:01:58+5:30
तीन वर्षापासून पीकविमा मिळत नसल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
परभणी- तीन वर्षापासून पीक विमा मिळत नसल्याने उद्विग्न झालेल्या एका शेतकऱ्याने दोरखंड घेऊन झाडावर चढत आंदोलन केल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास परभणी शहरातील बाजार समितीच्या कार्यालय परिसरात घडली.
तालुक्यातील बोरवंड येथील नरहरी तुकाराम यादव हे मागील तीन वर्षांपासून पीक विमा कंपनीकडे विमा भरत आहेत. तीनही वर्षामध्ये पिकांचे अतोनात नुकसान झाले. कधी दुष्काळामुळे तर कधी पावसामुळे पीक हाती आले नाही. पैसे भरुनही हक्काचा विमा मिळत नसल्याने अखेर सोमवारी सकाळी ११ वाजता झाडावर चढून नरहरी यादव यांनी हे आंदोलन केले. ही माहिती या कार्यालयाच्या बाजुस असलेल्या कोतवाली पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नरहरी यादव यांच्याशी चव्हाण यांनी संवाद साधत, त्यांची समजूत काढली. अर्ध्या तासांनी यादव झाडावरुन खाली उतरले.
२०१७ पासून विमा कंपनीकडे विमा भरत आहे. शेतातील पिकाचे नुकसान होत असतानाही विमा रक्कम मिळत नाही. एक हेक्टर शेती असून दरवर्षी सोयाबीन आणि कापसाचा विमा भरला आहे.मात्र प्रशासन माझ्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याचे नरहरी यादव यांनी सांगितले. तसेच आता खात्यावर फक्त २६ रुपये आहेत, पोराचे शिक्षण कस करायचे अशी हतबलता यादव यांनी मांडली.