परभणी जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रावर केवळ ४०८ क्विंटल तुरीची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 06:44 PM2018-02-14T18:44:51+5:302018-02-14T18:47:12+5:30
नाफेड मार्फत जिल्ह्यातील चार हमीभाव खरेदी केंद्रांवर १३ फेब्रुवारीपर्यंत ५० शेतकर्यांची ४०८ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. तर सेलू, गंगाखेड, बोरी हे तीन केंद्र सुरू होण्यास अद्याप मुहूर्त लागलेला नाही.
परभणी : नाफेड मार्फत जिल्ह्यातील चार हमीभाव खरेदी केंद्रांवर १३ फेब्रुवारीपर्यंत ५० शेतकर्यांची ४०८ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. तर सेलू, गंगाखेड, बोरी हे तीन केंद्र सुरू होण्यास अद्याप मुहूर्त लागलेला नाही.
यावर्षी जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन पिकांची पेरणी केली. त्यानंतर जिल्ह्यात पाऊस न झाल्याने सोयाबीन, मूग, उडीद ही पिके शेतकर्यांच्या हातची गेली. त्यानंतर परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे तूर पीक चांगले बहरले. त्यातून शेतकर्यांना चांगले उत्पादनही मिळाले.
मात्र शेतकर्यांचा शेतमाल जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीस आल्यानंतर खाजगी व्यापार्यांनी कवडीमोल दराने शेतकर्यांची तूर खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी संतप्त झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील परभणी, पूर्णा, जिंतूर, सेलू, गंगाखेड व बोरी या सहा ठिकाणी नाफेड मार्फत तर मानवत येथे विदर्भ फेडरेशनच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले.
या केंद्रावर शासनाने ठरवून दिलेल्या ५ हजार ४५० रुपये या हमीभाव दराने तूर खरेदीस सुरुवात झाली आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत परभणी केंद्रावर १०५ क्विंटल, पूर्णा येथील केंद्रावर ६५, जिंतूर २४ तर मानवत येथील केंद्रावर २१४ क्टिंल अशी एकूण जिल्ह्यातील सात केंद्रापैकी चार केंद्रवर ४०८ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. सध्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकर्यांना तूर साठवण करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हमीभाव खरेदी केंद्रावरील तूर खरेदीची गती वाढवावी, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
तीन केंद्रांना मिळेना मुुहूर्त
जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार सात खरेदी केंद्रावर ८ हजार ४५ शेतकर्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणीही केली आहे; परंतु, अद्यापपर्यंत केवळ चार ठिकाणचेच केंद्र सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील सेलू, गंगाखेड, बोरी या तीन केंद्रांवर ८ हजार ४५ शेतकर्यांपैकी सर्वाधिक ५ हजार ३५९ शेतकर्यांची नोंदणी झाली आहे; परंतु, अद्यापपर्यंत ही केंद्र सुरू झालेली नाहीत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकर्यातून संताप व्यक्त होत आहे.
तूर विक्रीसाठी ८ हजार शेतकर्यांनी केली नोंदणी
खाजगी बाजारपेठेमध्ये शेतकर्यांच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने जिल्ह्यातील ८ हजार ४५ तूर उत्पादक शेतकर्यांनी आपली तूर हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये परभणी तूर खरेदी केंद्रावर ३९२ शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. परंतु, केवळ ७ शेतकर्यांचीच आतापर्यंत तूर खरेदी करण्यात आली आहे. पूर्णा ३२५, जिंतूर ७५६, सेलू २०००, गंगाखेड १ हजार ३८, बोरी २ हजार ३२१ तर मानवत खरेदी केंद्रावर १ हजार २१३ शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत केवळ ५० शेतकर्यांची तूर खरेदी करण्यात आली आहे.