डीएनए तपासणीनंतरच गीताच्या कुटुंबीयांचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 01:42 AM2021-03-12T01:42:10+5:302021-03-12T01:42:58+5:30
आपलीच मुलगी असल्याचा वाघमारे कुटुंबीयांचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : २० वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात गेलेल्या मूकबधिर गीताच्या कुटुंबीयांचा शोध सुरू असून, याच दरम्यान जिंतूर येथील मीना वाघमारे यांनी गीता ही आपलीच मुलगी असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात डीएनए चाचणी झाल्यानंतरच तिच्या कुटुंबीयांचे सत्य पुढे येईल. त्यानंतरच परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती येथील पहल फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली.
रेल्वेने प्रवास करीत असताना १९९८ मध्ये गीता पाकिस्तानात गेली होती. त्यावेळी ती ६ वर्षांची होती. त्यानंतर भारत सरकारने गीताला भारतात आणले असून, तिच्या कुटुंबीयांचा सध्या शोध सुरू आहे. गीताने आपल्या गावाची ओळख सांगताना घराच्या आसपास रेल्वे स्टेशन, नदी आणि उसाची शेती असल्याचे सांगितले. त्यामुळे डिसेंबर २० मध्ये परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा आणि जिंतूर येथे काही ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्यात आली. त्यावेळी जिंतूर येथील परंतु सध्या औरंगाबाद येथे वास्तव्यास असणाऱ्या मीना वाघमारे यांनी गीता ही आपलीच मुलगी असल्याचा दावा केला. त्यामुळे मीना, त्यांची बहीण पूजा बनसोडे आणि गीता यांची जिंतूर येथे भेट घालून देण्यात आली. गीताच्या पोटावर जळाल्याची खून असल्याचे या कुटुंबीयांतील वृद्धेने सांगितले. त्यानुसार पाहणी केली असता गीताच्या पोटावर तशी खूण आढळली आहे. परंतु, मीना वाघमारे यांनी त्यांची मुलगी हरवल्यासंदर्भात कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलेली नाही किंवा काही जुनी कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे गीताच्या कुटुंबीयांची ओळख पटविण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातून डीएनए तपासणीची परवानगी घेतली जाणार आहे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाईल, असे पहल फाऊंडेशनचे अशोक सेलगावकर यांनी सांगितले.
गीता सध्या काय करतेय...
मूकबधिर गीताला आत्मनिर्भर करण्यासाठी पहल फाऊंडेशनचे अनिकेत सेलगावकर हे सांकेतिक भाषा शिकवित आहेत. किमान आठवीपर्यंतचे शिक्षण देऊन तिला नोकरी करता यावी व ती स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभी राहावी, यासाठी गीताला शिक्षण दिले जात आहे.