विषारी सापांच्या जिल्ह्यात केवळ चारच प्रजातींची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:22 AM2021-08-13T04:22:10+5:302021-08-13T04:22:10+5:30
जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून सापांविषयी बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. सर्पमित्रांची संख्याही लक्षणीयरित्या वाढली आहे. येथील सर्पमित्र रणजीत कारेगावकर, अनंत ...
जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून सापांविषयी बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. सर्पमित्रांची संख्याही लक्षणीयरित्या वाढली आहे. येथील सर्पमित्र रणजीत कारेगावकर, अनंत देशपांडे, सौरभ पवार, राजू पावटे, राजू शेरे, अभिषेक रोडे यांसह अनेक जण सापांना वाचविण्यासाठी आणि नागरिकांना भयमुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर सर्पमित्र रणजीत कारेगावकर यांनी सांगितले, जिल्ह्यात नाग, मण्यार, घोणस आणि पोवळा या विषारी सापांच्या प्रजाती आढळतात. उर्वरित सर्व साप हे बिनविषारी आहेत. त्यात अजगर, धामण, कवड्या, दिवड, तस्कर, कुकरी, वाळा, धूळ नागीण, मांडूळ, नानेटी, गवत्या या सापांचा समावेश आहे. मांजऱ्या आणि हरणटोळ हे निमविषारी साप असून, ते देखील जिल्ह्यात आढळतात, असे कारेगावकर यांनी सांगितले.
सापाला वाचविण्यातच माणुसकी
सापांबद्दल आजही अनेक गैरसमज आहेत. त्यातून साप मारण्याच्या घटना घडतात. परंतु, सापाला वाचविण्यातच खरी माणुसकी आहे. साप मारण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात बऱ्यापैकी कमी झाले आहे. सर्पमित्रांनी केलेली जनजागृती आणि साप आढळतातच तत्परतेने त्या ठिकाणी जाऊन सापाला जीवदान दिल्याने नागरिकांमध्येही जनजागृती झाली आहे. त्यामुळे सापाला न मारता सर्पमित्रांना बोलवावे, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
हजारो सापांना दिले जीवदान
परभणी जिल्हा सर्पमित्र व वन्यजीव संघटना मागील १८ वर्षापासून सापांना वाचविण्याचे काम जिल्ह्यात करीत आहेत. तसेच आजारी सापांवरही संघटनेकडून उपचार केले जात आहेत. या संघटनेचे अध्यक्ष ॲड. अनंत देशपााडे यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ पवार, राजू पावटे, राजू शेरे, अभिषेक रोडे हे सर्पमित्र सापांना वाचविण्याचे काम करीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत या संघटनेच्या सदस्यांनी अनेक सापांना जीवदान दिले आहे.