उघड दार देवा आता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:13 AM2021-06-23T04:13:17+5:302021-06-23T04:13:17+5:30
परभणी शहरासह जिल्ह्यात मागील एक वर्षभरापासून कोरोनाचे लाॅकडाऊन होते. या लाॅकडाऊनमध्ये मंदिरे, धार्मिक स्थळे बंदच होती. आता राज्य शासनाच्या ...
परभणी शहरासह जिल्ह्यात मागील एक वर्षभरापासून कोरोनाचे लाॅकडाऊन होते. या लाॅकडाऊनमध्ये मंदिरे, धार्मिक स्थळे बंदच होती. आता राज्य शासनाच्या वतीने कोरोनाची रुग्णसंख्या तसेच पाॅझिटिव्हिटी रेटचा विचार करून जिल्ह्यातील सर्व व्यवसाय, कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यानुसार परभणी जिल्हा मागील दोन आठवड्यांपासून अनलाॅक झाला आहे. मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनाने मागील दोन वेळेस काढलेल्या नियमावली आदेशात मंदिरे बंद ठेवण्याचा उल्लेख केला आहे. यामुळे भाविकांना मंदिरे कधी उघडणार याची प्रतीक्षा लागली आहे. आगामी काळातील सण, उत्सव लक्षात घेता ही मंदिरे कोरोना नियमावलीचे पालन करून सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी भाविकांतून होत आहे. मंदिरे बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना त्याचा फटका बसत आहे.
जिल्ह्यातील प्रमुख मंदिरे
त्रिधारा, नवागड, धनगर टाकळी, पोखर्णी, गंगाखेड येथील बालाजी मंदिर, संत जनाबाई मंदिर, रामपुरी, रत्नेश्वर, पाथरी येथील साईबाबा मंदिर, गुंज येथील चिंतामणी महाराज मंदिर, नैकोटवाडी येथील दत्त मंदिर, सेलू येथील केशवराज बाबासाहेब मंदिर, भोगाव देवी, पाचलेगाव ही जिल्ह्यातील, तर मोठा मारोती संस्थान, खंडोबा देवस्थान, बालाजी मंदिर, दत्तधाम, अष्टभूजा देवी मंदिर, पारदेश्वर मंदिर, बेलेश्वर महादेव, गणपती चौकातील गणपती मंदिर, शहरातील तीन स्वामी समर्थ मंदिर, चिंतामणी महाराज मंदिर ही प्रमुख मंदिरे आहेत.
किती दिवस कळसाचेच दर्शन
शहरासह जिल्ह्यात सर्व काही सुरू झाले आहे. मागील चार महिन्यांत गल्लीबोळातील मंदिरात सुद्धा देवाचे दर्शन घेता आले नाही. विविध ठिकाणच्या मंदिरांचे केवळ कळसाचेच दर्शन घेण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने नियम घालून मंदिरे सुरू करावीत.
- भरत उपाध्ये, भाविक.
मंदिर बंद असल्याने नित्य उपासना, पूजापाठ तसेच ठरलेले दररोजचे धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मंदिर सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे. घरीच देवाचे नामस्मरण करून पूजापाठ केला जात आहे.
- सुरेश जामकर, भाविक.
मंदिरात केवळ पुजारी दररोजची ठरलेली देवाची पूजा करीत आहेत. सण, उत्सवाला पाच भाविकांच्या उपस्थितीचे आदेश होते. रामनवमी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरी केली. मंदिर बंद असल्याने मंदिरातील दिवाबत्ती, विविध साहित्य खरेदी, मंदिराचे वीज बिल, मेंटेनन्स यासाठीचे मंदिर व्यवस्थापनाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
- संजय महाराज जोशी, वझरकर.
पूजेचे साहित्य, धार्मिक पुस्तके, देवाचे फोटो आणि हार-फूल तसेच प्रसाद यांचे दुकान गेल्या एक वर्षभरापासून बंद आहे. यामुळे कूटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने मंदिरे सुरू केल्यास आमचा व्यवसाय होईल.
- सुभाष हिरवे
जिल्ह्यातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये असलेल्या सण, उत्सवाप्रमाणे प्रसादाचे साहित्य घेऊन विक्रीसाठी जात होतो; पण सध्या मंदिरे बंद असल्याने एक रुपयाचाही व्यवसाय होत नाही. यामुळे आमचे आर्थिक गणित बिघडले आहे. आम्हाला रोजगार मिळवून द्यावा, अशी मागणी आहे.
- सुरेश हिरवे.