प्रस्थापितांना धक्का देत तरुणांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:18 AM2021-01-20T04:18:30+5:302021-01-20T04:18:30+5:30
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून विरोधात असणाऱ्या सायखेडा येथे भाजपाच्या नवख्या सुशील रेवडकर यांच्या पॅनेलला विजय मिळाला तर डिघोळ येथे अजय ...
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून विरोधात असणाऱ्या सायखेडा येथे भाजपाच्या नवख्या सुशील रेवडकर यांच्या पॅनेलला विजय मिळाला तर डिघोळ येथे अजय देशमुख या तरुणाच्या पॅनेलला गावकऱ्यांनी विजयी केले.
ग्रामपंचायत निकालावरून तालुक्यात शिवसेनेचा प्रभाव कमी होताना दिसला. शिवसेनेच्या ताब्यातील वाडी पिंपळगाव, कोठाळा, सायखेड, लोहिग्राम, धामोणी या ग्रामपंचायती त्यांच्या ताब्यातून गेल्या. तर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे यांच्या निमगावमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुकाराम भालेकर यांच्या पॅनेलने अटीतटीच्या लढतीमध्ये विजय मिळविला. भाजपकडे असलेली देवीनगर येथील ग्रामपंचायत विरोधकांच्या ताब्यात गेली असून विरोधात असलेल्या सायखेड ग्रामपंचायतीवर विजय मिळविण्यात भाजपला यश आले. तसेच खडका येथे भाजपाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांच्या पॅनेलमधून पराभूत झाले असून त्यांच्या पॅनेलला केवळ तीन जागांवर विजय मिळवता आला. तर भाजपाला निळा ग्रामपंचायतीवर पुन्हा विजय मिळविण्यात यश आले.
या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या ताब्यातील तिवठाणा, वंदन, कानेगाव या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला तर चुकार पिंपरी, डिगोळ, शिर्शी या ग्रामपंचायती विरोधकांच्या ताब्यातून खेचून आणण्यात काँग्रेसला यश आले. पूर्वी तालुक्यात जवळपास दहा ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व होते. यावेळेस १५ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. भिसेगाव, लासीना, थडी उक्कडगाव, शिरोरी या ग्रामपंचायतींवर पुन्हा विजय मिळविण्यात काँग्रेसला यश आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. यामध्ये तालुक्यातील सर्वात मोठ्या शेळगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मीकांत देशमुख यांनी सलग ३५ वर्षांपासून सत्ता आहे. ती या वेळेसही त्यांनी कायम राखत १५ पैकी १५ जागांवर विजय मिळवून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यासह तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील उक्कडगाव मक्ता, चुकार पिंपरी, शिर्शी, डिघोळ या ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसने गवळी पिंपरी, निमगाव, बोंदरगाव, खपाट पिंपरी, विटा खुर्द या ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा सत्ता काबीज केली आहे.