विरोधी पक्ष क्षीण; जनतेलाच विरोधी भूमिका घ्यावी लागेल : जिग्नेश मेवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 04:50 PM2019-08-28T16:50:49+5:302019-08-28T16:55:42+5:30

भाजपला देशात विरोधी पक्षच नको आहे आणि त्या दृष्टीनेच पावले उचलली जात आहेत़

The opposition is weakened; The masses have to take the opposite role : Jignesh Mewani | विरोधी पक्ष क्षीण; जनतेलाच विरोधी भूमिका घ्यावी लागेल : जिग्नेश मेवाणी

विरोधी पक्ष क्षीण; जनतेलाच विरोधी भूमिका घ्यावी लागेल : जिग्नेश मेवाणी

Next
ठळक मुद्दे रोजगार देण्याऐवजी रोजगार हिसकावून घेतला जात आहेसर्वसामान्य नागरिकांनाही ईव्हीएमविषयी शंका

परभणी : काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा करणाऱ्या भाजपला देशात विरोधी पक्षच नको आहे आणि त्या दृष्टीनेच पावले उचलली जात आहेत़ विरोधी पक्ष क्षीण झाले असून, देशभरात नैराश्याचे वातावरण आहे़ त्यामुळे जनतेलाच आता विरोधी भूमिका घ्यावी लागेल, असे मत आ़ जिग्नेश मेवाणी यांनी येथे व्यक्त केले़ 

राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या माध्यमातून जिग्नेश मेवाणी यांनी ‘संविधान बचाव देश बचाओ’ या अभियानांतर्गत संविधान सन्मानयात्रा सुरू केली आहे़ मंगळवारी ही यात्रा परभणीत दाखल झाली़ या निमित्ताने आ़ जिग्नेश मेवाणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, २ कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते़ मात्र प्रत्यक्षात त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे़ देशभरात मंदीची लाट आहे़ विविध कंपन्या रोजगार देण्याऐवजी असलेल्या कर्मचाऱ्यांना काढत आहेत़ त्यामुळे रोजगार देण्याऐवजी रोजगार हिसकावून घेतला जात आहे, ‘हेच का अच्छे दिन’  असा सवाल त्यांनी केला.

आ़ मेवाणी म्हणाले, ईव्हीएम मशीनमध्ये गडबडी असल्याचा कुठलाही आधार नाही़ परंतु, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिकांनाही ईव्हीएमविषयी शंका निर्माण झाली आहे़ तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रामाणिक असतील तर त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले़ या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे जिल्हाध्यक्ष रवी सोनकांबळे, निवृत्ती सांगवे, निलेश देशभ्रतार, दिलीप साळवे, संजय टेकुळे, रोहिदास लांडगे आदींची उपस्थिती होती़ 

गुजरात मॉडेलच्या बहकाव्यात येऊ नये
गुजरात मॉडेलचा कांगावा केला जात आहे़ परंतु, या बहकाव्यात राज्यातील नागरिकांनी येऊ नये. २२ वर्षांत देशात ३ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी देणे घेणे नसल्याचे दिसत आहे़ या राज्यात संविधान मोडून काढणे आणि त्या जागी मनुस्मृतीचा अवलंब करणे ही एकमेव संघप्रणित कार्यप्रणाली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला़  दाभोळकर यांची हत्या संविधान मूल्यांची हत्या आहे, असे सांगून राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन करणे, विज्ञानवादी विचार रुजविणे आणि विपक्ष म्हणून जनतेची जागृती करणे यासाठी ही यात्रा काढली असल्याचे ते म्हणाले.

Web Title: The opposition is weakened; The masses have to take the opposite role : Jignesh Mewani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.