शेतावरच संत्रा बागेचा केला लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:27 AM2020-12-05T04:27:33+5:302020-12-05T04:27:33+5:30
गोविंद जोशी यांनी ढेंगळी पिंपळगाव येथील त्यांच्या शेतीत साडेतीन एकर क्षेत्रावर ५२५ झाडांची संत्रा बागेची लागवड केली आहे. ...
गोविंद जोशी यांनी ढेंगळी पिंपळगाव येथील त्यांच्या शेतीत साडेतीन एकर क्षेत्रावर ५२५ झाडांची संत्रा बागेची लागवड केली आहे. बागेतील झाडांवर मृग बहराची फळे लागलेली आहेत. ही फळे साधारणता मार्च महिन्यात परिपक्व होतात. उभ्या झाडांवरील फळांचे गुत्ता पद्धतीने किंवा वजनावर विक्री व्यवहाराचे सौदे करण्याची पद्धत सर्वत्र प्रचलित आहे. जून, जुलै पासून ते फेब्रुवारी, मार्च पर्यंत असे सौदे देण्याची प्रक्रिया चालू असते. हा सौदा व्यवहार शेतकरी आणि खरेदीदार व्यापारी या दोघांमध्ये होत असतो. फेब्रुवारी, मार्च मधील संभाव्य बाजार किमतीचा अंदाज लावणे शेतकऱ्यासाठी कठीण असल्यामुळे हे सौदे योग्य किमतीत होण्याची शक्यता खूप कमी असते. यावर्षी संत्र्याच्या मृग बहराची फूट महाराष्ट्रात मुख्यता विदर्भात खूप कमी असल्यामुळे सर्वत्र भावात तेजीची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर गोविंद जोशी यांनी ४० ते ५० व्यापाऱ्यांना निमंत्रण देऊन लिलावा अगोदर नोंदणी करून घेतली. त्यानंतर लिलाव पद्धतीने संत्रा बागेच्या झाडावरील फळांचा गुत्ता पद्धतीने विक्री सौदा दिला. लिलावात वीस व्यापाऱ्यांनी भाग घेतला होता. मेहकर जि. बुलढाणा येथील बागवान हाजी सय्यद रफिक यांनी सर्वात जास्त बोली लावून २० लाख २१ हजार रुपयात हा सौदा विकत घेतला. याप्रसंगी परिसरातील अनेक फळबागायतदार शेतकरी, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, सेलू येथील मोंढ्यातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शेतावर फळांच्या लिलावाचा नवा पॅटर्न जोशी यांनी निर्माण केला.