६ हजार कुक्कुट पक्षी नष्ट करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:42 AM2021-01-13T04:42:03+5:302021-01-13T04:42:03+5:30

परभणी : तालुक्यातील मुरुंबा येथील ८०० कोंबड्यांचा ‘बर्ड फ्लू’ने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुरुंबा गावाच्या १ कि.मी. त्रिजेतील ...

Order to destroy 6,000 chickens | ६ हजार कुक्कुट पक्षी नष्ट करण्याचे आदेश

६ हजार कुक्कुट पक्षी नष्ट करण्याचे आदेश

Next

परभणी : तालुक्यातील मुरुंबा येथील ८०० कोंबड्यांचा ‘बर्ड फ्लू’ने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुरुंबा गावाच्या १ कि.मी. त्रिजेतील सुमारे ६ हजार कुक्कुट पक्ष्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग (नष्ट करणे) करून विल्हेवाट लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी सायंकाळी दिले.

मुरुंबा येथील कुक्कुट पक्ष्याचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ने झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि हिवताप विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावात उपाययोजना सुरू केल्या आहेत. मुरुंबा गावाच्या १ कि.मी. परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला असून, सोमवारी या ठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले. बर्ड फ्लूने कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने हा संसर्ग इतर ठिकाणी पोहोचू नये, यासाठी या परिसरातील कुक्कुट पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. त्यासाठी सोमवारी दिवसभर विविध विभागांची परवानगी घेतल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सायंकाळच्या सुमारास एका आदेशाद्वारे प्राण्यांमधील संक्रमित व संसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार मुरुंबा परिसरातील कुक्कुट पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे मुरुंबा गावाजवळील १० कि.मी. परिसरातील पक्ष्यांची विक्री, खरेदी, वाहतुकीवर बंदी घातली आहे.

कुपटा गावात प्रतिबंधित क्षेत्र

सेलू तालुक्यातील कुपटा येथेही ५०० कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. या गावात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. कुपटा येथील कोंबड्यांचा मृत्यू अज्ञात कारणाने झाला असून, या मृत्यूचा निष्कर्ष येणे बाकी आहे. मात्र, या अज्ञात रोगाचा प्रसार इतर ठिकाणी होऊ नये, या उद्देशाने सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत गाव शिवारापासून ५ कि.मी. परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार, तसेच प्रदर्शनास प्रतिबंध घालण्यात आला आहे. कुपटा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: Order to destroy 6,000 chickens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.