निम्न दुधनाच्या कालव्याचे काम नव्याने करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 03:25 PM2019-09-16T15:25:26+5:302019-09-16T16:14:38+5:30
निकृष्ट कामाचा परिणाम
- मारोती जुंबडे
परभणी : निम्न दुधना प्रकल्पातून निघालेल्या उजव्या कालव्याचे काम कुंभारी बाजार परिसरात निकृष्ट दर्जाचे झाले असून, आता हे काम नव्याने करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे़ या आदेशामुळे निकृष्ट कामावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले असून, या प्रकरणात कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र पाठीशी घातले जात असल्याचा आरोप लाभधारक शेतकरी करीत आहेत़
निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात मुख्य कालवे, चाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली़ परंतु, प्रत्यक्षात हे काम योग्य दर्जाचे होत नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण होत आहे़ निम्न दुधना प्रकल्पातून निघालेल्या उजव्या कालव्याचे काम परभणी तालुक्यातील कुंभारी बाजार या गावापर्यंत पूर्ण झाले आहे़ मात्र, काही महिन्यांतच कालव्याला जागोजागी तडे गेले आहेत़ काम निकृष्ट झाल्याचे अभियंत्यांच्याच लक्षात आले़ कालव्याला सिमेंट काँक्रीटीकरण करताना ४ इंच जाडीचा थर देणे अपेक्षित असताना केवळ २ इंचाचा थर दिला. त्यामुळे काही भागाचे काम नव्याने करण्याचे आदेश दिले आहे.
मुख्य कालव्यालाच जागोजागी तडे
च्निम्न दुधना प्रकल्पाच्या मुख्य कालव्यालाच अनेक ठिकाणी तडे गेले आहेत़ कालव्याच्या बाजूने जाणाऱ्या पक्क्या रस्त्यावर मुरमाचा भराव टाकला नाही़ परिणामी जड वाहनांच्या वाहतुकीमुळे सिमेंट काँक्रीटचे थर चक्क उखडून गेले आहेत़ विशेष म्हणजे, हे काम पूर्ण होऊन साधारणत: दोन-तीन महिन्यांचाच कालावधी लोटला आहे़