पाण्याची बॉटल मागवत हॉटेलचा गल्ला केला साफ; पोलिसांनी पाठलाग करत चौघांना केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 06:16 PM2021-08-28T18:16:34+5:302021-08-28T18:24:25+5:30
आरोपींच्या ताब्यातील रिक्षामध्ये तलवार, गज आढळून आढळून आले आहेत.
देवगावफाटा ( परभणी : रस्त्यावरील हॉटेल चालकास उठवून पाण्याची बॉटल मागवली. तो बॉटल आणण्यास जाताच हॉटेलचा गल्ला साफ केल्याची घटना शनिवारी पहाटे देवगावफाटा येथे घडली. प्रसंगावधान राखत हॉटेल चालकाने पोलिसांनी संपके केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रिक्षातून फरार झालेल्या चौघांना लागलीच ताब्यात घेतले आहे.
देवगावफाटा येथील हॉटेल चालक एकनाथ मधुकर गरड शुक्रवारी रात्री हॉटेलमध्ये झोपले होते. शनिवारी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास एका ऑटोरिक्षामधून (क्र.एम एच २० ई एफ ६८०९) चौघेजण हॉटेलमध्ये आले. त्यांनी गरड यांना झोपेतून उठवून पाण्याची बॉटल मागीतली. गरड पाण्याची बॉटल आणण्यासाठी गेले असता चोरट्यांनी गल्यातील १ हजार रुपये काढून घेत रिक्षातून सेलूच्या दिशेने गेले. एकनाथ गरड यांनी घटनेची माहिती चारठाणा पोलीसांना दिली. पोलीस निरीक्षक बळवंत जमादार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप आलापूरकर, बीट जमादार गुलाब भिसे, कर्मचारी शिवदास सुर्यवंशी, विष्णुदास गरुड, प्रल्हाद भानुसे यांनी लागलीच घटनास्थळ गाठले.
यानंतर पोलिसांनी एकनाथ गरड, जिजाभाऊ पवार, प्रदिप मोरे यांना सोबत घेत रिक्षाचा शोध घेतला. मोरेगांव नजीक पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतले. प्रेम भिकन नरवाडे, प्रतीक उर्फ साईनाथ गणेश खडके, आनंद रवींद्र पगडे, शेख मुस्ताफा शेख मुबारक ( सर्व रा. औरंगाबाद) असे आरोपींची नावे आहेत. यावेळी रिक्षामध्ये तलवार ,गज आढळून आढळून आले. यावरून हे घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांच्याकडून इतर अनेक गुन्हे उघडकीस येऊ शकतात असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. गरड यांच्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द भांदवी कलम ३७९ व शस्रअधिनियम १९५९ चे कलम ४,२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप अलापुरकर हे करत आहेत.