जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:13 AM2017-11-20T00:13:55+5:302017-11-20T00:14:04+5:30
खरीप हंगामातील कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढला असून, जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागातील तज्ञ वर्तवित आहे. कृषी विभागाने आता प्रादुर्भावाचे सर्वेक्षण सुरू केले असून, सर्वेक्षणाअंतीच या संकटाचे गांभीर्य समोर येणार आहे. दरम्यान, तक्रारी वाढू लागल्यानंतर अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने आता कुठे पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : खरीप हंगामातील कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढला असून, जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागातील तज्ञ वर्तवित आहे. कृषी विभागाने आता प्रादुर्भावाचे सर्वेक्षण सुरू केले असून, सर्वेक्षणाअंतीच या संकटाचे गांभीर्य समोर येणार आहे. दरम्यान, तक्रारी वाढू लागल्यानंतर अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने आता कुठे पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात ५ लाख २१ हजार ८७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीेचे नियोजन झाले होते. त्यापैकी २ लाख ९ हजार ४८ हेक्टर क्षेत्र कापसासाठी प्रस्तावित होते. प्रत्यक्षात १ लाख ८७ हजार ५५७ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. बहुतांश भागात कापसाची पहिली वेचणी झाली असून, सर्वसाधारणपणे चार वेचण्या होतात. मात्र पहिल्याच वेचणीनंतर जिल्ह्यातील कापूस पिकाला शेंदरी बोंडअळीने (गुलाबी बोंडअळी) घेरल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सर्व भागामध्ये बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला आहे. एकही क्षेत्र प्रादूर्भावापासून बचावले नाही. त्यामुळे शेतकरी नव्या संकटात सापडले आहेत. कृषी विभागाबरोबरच प्रशासनालाही या संकटाची चाहूल लागल्यानंतर आता उपाययोजनेची कामे सुरु झाली आहेत.
बोंडअळीचा प्रादूर्भाव होत असल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील अनेक भागांमधून कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे हा प्रादूर्भाव किती, या विषयीची पाहणी कृषी विभाग सुरू केली आहे. कृषी विभाग आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहाय्याने सर्व्हेक्षण सुरु झाले आहे. १ लाख ८७ हजार ५५७ हेक्टरवरील कापसापैकी ४० टक्के पिकावर प्रादुर्भाव असल्याची चर्चाही कृषी विभागातील तज्ज्ञांकडून ऐकावयास मिळाली. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी आयसीआरचे अधिकारी परभणीत आले होते. या अधिकाºयांनी प्रायोगिक तत्वावर परभणी तालुक्यातील झरी आणि टाकळी कुंभकर्ण परिसरात क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत घेतलेल्या प्लॉटची पाहणी केली, तेव्हा १० बोंडापैकी ६ बोंडावर अळीचा प्रादूर्भाव आढळून आला, अशी माहिती मिळाली आहे. यास कृषी विभागातून अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी एकंदर ४० ते ५० टक्के प्रादूर्भाव झाल्याचा अंदाज आहे.
कृषी विभागातील अधिकाºयांनी जिल्ह्यात गावनिहाय सर्व्हेक्षणाला सुरुवात केली आहे. हे सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर बोंडअळीच्या प्रादूर्भावाचा प्रत्यक्ष आवाका समोर येणार आहे. सध्या तरी बोंडअळीमुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आल्याचे दिसत आहे.
दरम्यान, बोंडअळीच्या प्रादूर्भावासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना फोन केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे कृषी विभाग या संदर्भात काय उपाययोजना करीत आहे, या विषयीची माहिती मिळू शकली नाही.