परभणी शहराचा बाह्य वळण रस्ता : ८५ कोटींचा प्रस्ताव निधीअभावी रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:03 AM2018-05-22T00:03:36+5:302018-05-22T00:03:36+5:30
राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्य वळण रस्त्यासाठी ८५ कोटींचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याने जमीन संपादनाची प्रक्रिया रखडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्य वळण रस्त्यासाठी ८५ कोटींचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याने जमीन संपादनाची प्रक्रिया रखडली आहे.
कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठी परभणी शहराबाहेरुन वळण रस्ता काढला जात आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी परभणी, धर्मापुरी, वांगी, असोला, पारवा या पाच गावांच्या शिवारातील जमिनींचे संपादन केले जाणार आहे.
जमिनीची मोजणी, शेतकरीनिहाय क्षेत्र आदीबाबी पूर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाने प्रत्येक शेतकऱ्यांची सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढली आहेत. जमिनीच्या मूल्यमापनाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.
१४.५ कि.मी. अंतराचा हा बाह्यवळण रस्ता असून या रस्त्यासाठी जमीन संपादन करणे आवश्यक आहे. मूल्यमापनाअंती भूसंपादन विभागाने ८५ कोटी रुपयांची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. दीड महिन्यापूर्वी हा प्रस्ताव प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याकडे पाठविण्यात आला. मात्र यावर अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही.
भूसंपादन विभागास निधी प्राप्त झाला नसल्याने जमीन संपादनाची प्रक्रियाच रखडली आहे. पर्यायाने बाह्यवळण रस्त्याच्या कामासही विलंब लागत आहे.
तीन वर्षांपासून काम ठप्प
बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी जमीन संपादन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जमिनीची मोजणी, त्याचे मूल्यमापन या बाबी पूर्ण झाल्या असून ही जमीन केंद्र शासनाच्या ताब्यात आल्यानंतर प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. सद्यस्थितीला परभणी जिल्ह्यामध्ये मानवतपर्यंत आणि झिरोफाट्यापासून पुढे राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने होत आहे. मात्र बाह्यवळण रस्त्याच्या कामालाच विलंब लागत आहे. जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन बाह्यवळण रस्त्याचे कामही सुरु करावे, अशी मागणी होत आहे.
...तर शहरातील वाहतूक होईल सुरळीत
बाह्यवळण रस्ता पूर्ण झाल्यानंतर शहरातून धावणारी जड वाहने बाह्यवळण रस्त्याने धावतील. परिणामी शहरातून जाणाºया वसमत रस्त्यावरचा भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्त्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.