ओव्हरटेक करणे जिवावर बेतले! दुचाकी थेट बसवर धडकली, दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 12:48 IST2025-04-21T12:48:00+5:302025-04-21T12:48:42+5:30
अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील शंकर व बालासाहेब हे दोघे जागीच ठार झाले.

ओव्हरटेक करणे जिवावर बेतले! दुचाकी थेट बसवर धडकली, दोघांचा जागीच मृत्यू
झरी (परभणी) : परभणी-जिंतूर मार्गावरील जलालपूर शिवारात बस दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. शंकर लक्ष्मण जीवणे व बालासाहेब शेषेराव घुगे (दोघेही रा. केहाळ, ता. जिंतूर) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत.
शंकर जीवने व बालासाहेब घुगे हे दोघे रविवारी दुपारी दुचाकीने (एम.एच.२२, के. ०५५७) परभणीहून जिंतूरकडे जात होते. दरम्यान जलालपूर ते नांदापूर शिवारात येताच एका बसला ओव्हटेक करताना समोरून येणाऱ्या रिसोड-लातूर बस (एम.एच.४०, एन ९५०४) ला धडकले.
अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील शंकर व बालासाहेब हे दोघे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि. विक्रम हराळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद घेण्यात आली नव्हती. अधिक तपास पोलीस करीत आहेत.