एका आठवड्यात ४८८० रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:18 AM2021-04-27T04:18:08+5:302021-04-27T04:18:08+5:30
परभणी : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली असून, कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आठवडाभरात ...
परभणी : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली असून, कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आठवडाभरात चार हजार ८८० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, कोरोनामुक्तीचा दर वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढत वाढत गेली. २२ एप्रिल रोजी सर्वाधिक एक हजार २२० रुग्णांची नोंद झाली होती. वाढलेल्या रुग्णांबरोबरच उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मृत्यूदेखील वाढत असल्याने जिल्हावासीय चांगले चिंताग्रस्त झाले होते. परंतु, याच काळात कोरोनामुक्तीचा दर वाढला आहे. १९ ते २६ एप्रिल या आठ दिवसांमध्ये चार हजार ८८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर मागील आठवड्यातील ११ ते १८ एप्रिल या आठ दिवसांमध्ये तीन हजार ९८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात ८९३ अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या चिंता काही प्रमाणात कमी झाल्या आहेत.
रविवारी बाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त अधिक
वाढलेल्या संसर्गामुळे मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आणि कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी नोंद होत होती. मात्र, २५ एप्रिल रोजी बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षाही कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली. रविवारी एक हजार १७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ६३९ नव्या रुग्णांची नोंद झाली. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे दिसत आहे.