परभणीतील बसपोर्टच्या कामाला येईना गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:30 AM2019-11-24T00:30:52+5:302019-11-24T00:32:04+5:30
परभणी येथे अद्ययावत असे बसपोर्ट उभारणीसाठी राज्य शासनाने एक वर्षापूर्वी मंजुरी दिली खरी; परंतु, अद्यापही बसपोर्टच्या कामास गती मिळत नसल्याने परभणीकरांच्या बसपोर्टच्या स्वप्नाला अधिकारी व संबंधित गुत्तेदारांकडून खीळ बसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी येथे अद्ययावत असे बसपोर्ट उभारणीसाठी राज्य शासनाने एक वर्षापूर्वी मंजुरी दिली खरी; परंतु, अद्यापही बसपोर्टच्या कामास गती मिळत नसल्याने परभणीकरांच्या बसपोर्टच्या स्वप्नाला अधिकारी व संबंधित गुत्तेदारांकडून खीळ बसत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी येथील बसस्थानकाचे रुपांतर अद्ययावत अशा बसपोर्टमध्ये करण्यासाठी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी १३ कोटी ४ लाख ४८ हजार ६०० रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. परभणी बसस्थानकाची सातत्याने दुरवस्था होत असल्याने या बसस्थानकाचे अद्यावतीकरण करण्याची संकल्पना रावते यांची होती. त्यासाठी आ.डॉ.राहुल पाटील यांनीही सातत्याने पाठपुरावा केला. मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याने परभणी बसस्थानकातील दुरवस्था दूर होऊन प्रवाशांना सुसज्ज असे बसस्थानक उपलब्ध होईल, अशी आशा होती; परंतु, निधी मंजूर होऊन वर्षभराचा कालावधी उलटला आहे. विशेष म्हणजे या कामाच्या तीन वेळेस निविदाही काढण्यात आल्या. तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते उद्घाटनही झाले; परंतु, अद्यापपर्यंत शेड ठोकण्याचेच काम संबंधित गुत्तेदारांकडून झाले आहे. या व्यतिरिक्त वर्षभरात या बसपोर्टचे काम पुढे गेले नाही. त्यामुळे प्रवाशांना व बसचालक वाहकांना आजही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. विशेष म्हणजे, या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांसह एस.टी. महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वर्षभरापासून केवळ काम सुरु असल्याचा आव आणणाºया एस.टी. महामंडळ प्रशासनाने याकडे लक्ष घालून परभणीकरांच्या बसपोर्टच्या स्वप्नाला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.
वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज
४महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक कार्यालय परभणी शहरातील गंगाखेड रस्त्यावर कार्यरत आहे. या विभागातून परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यातील ७ आगारांचा कारभार पाहिला जातो. परभणी शहरातील बसस्थानक हे दोन्ही जिल्ह्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक आहे. मुंबई, पुणे व इतर शहरांसह राज्यात प्रवास करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश प्रवासी परभणी बसस्थानकावरच येतात.
४त्यामुळे हे बसस्थानक सुसज्ज असणे आवश्यक आहे; परंतु, असे होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा करुन १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला; परंतु, एस.टी. महामंडळ प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका या बसपोर्टला बसत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.