आवास योजनेत पालम, मानवत पंचायत समित्या प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:24 AM2021-08-17T04:24:11+5:302021-08-17T04:24:11+5:30
भारतीय स्वातंत्रदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते आवास ...
भारतीय स्वातंत्रदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते आवास योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या पंचायत समित्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) प्रथम आलेल्या पालम पंचायत समितीचा तसेच राज्य पुरस्कार आवास योजनेत (ग्रामीण) प्रथम आलेल्या मानवत पंचायत समिती, द्वितीय सेलू तर तृतीय आलेल्या पालम पंचायत समितीचा जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महाआवास अभियानांतर्गत सर्वोकृष्ट गृहनिर्माण अभियंता प्रथम पुरस्कार विनय पाटील यांना द्वितीय पुरस्कार अभियंता शेख उस्मान शेख रशिद व तृतीय पुरस्कार स्थापत्य अभियांत्रिकी सहायक बोबडे यांना प्रदान करण्यात आला. राज्य पुरस्कारांतर्गत आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) गृहनिर्माण अभियंता प्रथम पुरस्कार कैलास अंभोरे व द्वितीय पुरस्कार राहुल साळवे, तृतीय पुरस्कार अभियंता प्रतीक जगताप यांना प्रदान करण्यात आला. ही योजना ग्रामीण पातळीवर यशस्वीपणे राबविल्याबद्दल मानवत तालुक्यातील रामेटाकळी ग्रामपंचायतीला प्रथम तर भोसा ग्रा.पं.ला द्वितीय पुरस्कार देण्यात आला. तसेच राज्य पुरस्कार प्राप्त चुडावा, इरळद व जवळा ग्रा.पं.चाही गौरव करण्यात आला. राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्यामार्फत जनआरोग्य योजनेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयास गोल्ड व परभणी मनपा रुग्णालयास सिल्व्हर आणि मानवत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला कास्य प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भारतीय बॉक्सिंग संघाच्या शिबिरासाठी पात्र ठरलेली खेळाडू ऋतुजा तुकाराम ठोंबरे हिचा प्रशिक्षकासह गौरव करण्यात आला. यावेळी स्मार्ट ग्राम पुरस्कार गंगाखेड तालुक्यातील ग्रामपंचायत खादगावला देण्यात येऊन गौरव करण्यात आला.